मुंबई - बंधुभावाची शिकवण देणारा इस्लामी संस्कृतीचा दुसरा महान सण म्हणजे बकरी ईद, त्यानिमित्ताने आज कुर्ला पूर्व येथे सकाळी सामूहिक नमाज अदा करण्यात आली व सर्वांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या. तसेच यावेळी पूरग्रस्तांसाठी दुआ मागितली आहे.
कुर्ला पूर्व येथे सकाळी 7 वाजता सामूहिक नमाज अदा करण्यात आली. सकाळीच हजारोच्या संख्येत मुस्लीम बांधव नमाज अदा करण्यासाठी एकत्र आले होते. कुर्ला पूर्व स्टेशनजवळ रस्त्यावर ही नमाज अदा करण्यात आली. कुर्ला परिसरात मुस्लीम धर्मियांची जास्त संख्या आहे. हा परिसर अतिशय दाटीवाटीचा असल्याने आणि मस्जिद लहान असल्याने एकाच वेळी हजारोंच्या संख्येने मुस्लीम बांधवांनी रस्त्यावर नमाज अदा केली. नमाज झाल्यावर एकमेकांना ईद मुबारक म्हणून शुभेच्छा देण्यात आल्या. इमाम झुल्फिकार यांनी सर्वांना ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
अनुचित प्रकार होऊ नये, म्हणून यासाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तसेच, बेस्टने आपल्या बसेस तात्पुरत्या त्या रस्त्यावरून बंद करण्यात आल्या होत्या.