मुंबई : खासदार नवनीत राणा ( MP Navneet Rana ) आणि आमदार रवी राणा ( MLA Ravi Rana ) आरोपी (Application of Rana couple ) असलेल्या प्रकरण सुनावणीत राणा यांचे वकील रिझवान मर्चंट यांनी थेट डिस्चार्ज अप्लिकेशन कोर्टात दाखल केले आहे. विशेष म्हणजे FIR दाखल नसतांना कलम 353 नुसार पोलीस राणा दाम्पत्याला अटक कसे करू शकतात ? हा सवाल त्यांनी उपस्थिती केला आहे. आता ही तांत्रिक चूक पोलिसांचा हलगर्जीपणा का जाणूनबुजून केलेली चूक ? हा सवाल उपस्थित झाला आहे. दरम्यान कोर्टाने सरकारी वकिलांना 2 फेब्रुवारीला खुलासा सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. (Hanuman Chalisa case)
राणा दांपत्यांचा न्यायाधीशाकडे अर्ज : तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री येथील निवासस्थानी हनुमान चालीसा पठण प्रकरणावरून खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्या विरोधात खार पोलिसांनी राष्ट्रद्रोह आणि शासकीय कामांमध्ये अडथळा निर्माण केल्या प्रकरणात गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर राणा दांपत्यांना 14 दिवसांपेक्षा अधिक काळ तुरुंगात देखील राहावे लागले होते. आता या प्रकरणातून दोष मुक्त करण्यात यावे याकरिता राणा दांपत्ये यांचे वकील रिझवान मर्चंट ( Advocate Rizwan Merchant ) यांनी न्यायाधीश राहुल रोकडे यांच्यासमोर अर्ज दाखल केला आहे.
राज्य सरकारला उत्तर दाखल करण्याचे निर्देश : वकील रिझवान मर्चंट यांनी आपल्या अर्जात असे म्हटले आहे की खार पोलिसांकडून करण्यात आले ही चुकीची आहे. कलम 353 नुसार अटक कशी होऊ शकते ? असा प्रश्न देखील यावेळी अर्जातून विचारण्यात आला आहे. राणा दांपत्ये यांच्या अर्जावर राज्य सरकारला उत्तर दाखल करण्याचे निर्देश सत्र न्यायालयाने दिले आहे. तसेच या प्रकरणात पुढील सुनावणी 2 फेब्रुवारी रोजी होणार आहे.
जामीन पात्र वॉरंट जारी : तत्कालीन मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या खाजगी मातोश्री निवासस्थानासमोर हनुमान चालीसा वाचण्यावरून झालेल्या कारवाईदरम्यान खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी पोलीस कर्मचाऱ्यांसोबत शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणात त्यांच्या विरोधात खार पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणात दोन तारखेला गैरहजर राहिल्याने त्यांच्या विरोधात सत्र न्यायालयातील विशेष पी एम एल ए कोर्टाचे न्यायाधीश राहुल रोकडे यांनी जामीन पात्र वॉरंट जारी केला होता त्यानंतर यांनी न्यायालयात हजर राहून वॉरंट रद्द करून घेतला होता.
काय आहे प्रकरण : सध्या राज्यात मशिदींवरील भोंगे, हिंदुत्व आणि हनुमान चालिसा यावरुन राजकारण चांगलच तापल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच अमरावतीच्या खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा यांनी काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या मातोश्री बाहेर हनुमान चालीसाचे पठण करणार असल्याची घोषणा केली होती. राणा दाम्पत्यांच्या घोषणेनंतर राज्यभरातून शिवसैनिक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले होते. राणा दाम्पत्य मातोश्रीबाहेर हनुमान चालीसा पठण करण्यासाठी मुंबईत दाखल झाले, तर दुसरीकडे शिवसैनिकांनी राणा दाम्पत्याविरोधात मातोश्रीबाहेर ठिय्या दिला. राणांच्या घोषणेनंतर शिवसेना समर्थक चांगलेच संतप्त झाले आणि त्यांनी राणा यांच्या खार येथील घराबाहेर जोरदार निदर्शने केली. तसेच, दोन दिवस शिवसैनिकांनी मातोश्रीबाहेरही राणा दाम्पत्यांविरोधात ठिय्या दिला होता.
14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली : तब्बल तीन दिवस हाय व्होल्टेज ड्रामा सुरुच होता. त्यानंतर अखेर पंतप्रधान मुंबईत येत असल्याने आपण मातोश्रीबाहेर हनुमान चालीसाचे पठण करण्यासाठी जाणार नसल्याचे राणा दाम्पत्याने व्हिडीओ जारी करत सांगितले आणि या नाट्यावर पडदा पडला. पण त्यानंतर राणा दाम्पत्याच्या अडचणीत मोठी वाढ झाली. पोलिसांनी खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांना अटक केली. त्या दिवशीची रात्र राणा दाम्पत्याची पोलीस कोठडीतच गेली. दुसऱ्या दिवशी रविवारी त्यांना न्यायालयासमोर हजर केले गेले. न्यायालयाने त्यांना 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. तर त्यांच्या जामीन अर्जावर तातडीची सुनावणी नामंजूर करत 29 एप्रिलला सुनावणी होणार असल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर राणा दाम्पत्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली होती.