मुंबई : आनंद महिंद्रा हे नाव देशात जवळपास सर्वांनाच परिचित आहे. महिंद्रा हे देशातील प्रसिद्ध उद्योजक आहेत. आनंद महिंद्रा हे त्यांच्या ट्विटमुळे नेहमीच चर्चेत असतात. त्यामुळे त्यांची जनमानसात असलेली प्रतिमा अतिशय वेगळी आहे. मात्र, देशातील अशा प्रसिद्ध उद्योगपती विरोधात मुंबईचा एक तरुण आमरण उपोषणाला बसणार आहे. अमोल कांबळे असे या तरुणाचे नाव असून अमोल कांबळे यांनी आनंद महिंद्रा यांच्यावर फसवणुकीचा आरोप केला आहे.
नेमकं प्रकरण काय? ईटीव्हीशी बोलताना अमोल कांबळे यांनी सांगितलं की, 'मी दिनांक 04/10/2021 रोजी निविदा भरल्यानंतर मला लेटर ऑफ इंटेंन्ट आल्यानंतर मला दिनाक 14/10/2021 रोजी काँट्रॅक्ट मंजूर झाला त्यासंदर्भात मला मंहिंद्रा हॅपीनेस्ट डेव्हलपर्स लि. ने लेटर ऑफ अवार्ड दिला होता. त्यानंतर मी नांदोरे गावात फेज 11 चे 567.8 या बिल्डींगचे बांधण्याचे काम एकूण निविदा रक्कम आठ करोड चौतिस लाख चाळीस हजार सहाशे रुपयामध्ये ठरले होते. त्याप्रमाणे मी सदरच्या बांधकाम साईटवर काम केले. त्या ठिकाणी मी शटरींग मटेरियलस कटेनर्स, मशिनरी इतर बाधकाम साहित्य एकूण अंदाजित रक्कम दिड करोड रुपयेचे साईटवर अडकवून ठेवले आहे.'
महिंद्रा कंपनीकडे 4 कोटी 16 लाख थकीत : हे सर्व साहित्य मी स्वखर्चाने विकत घेतले आहे. तसेच सदरच्या साईटचे काम पूर्णत्वास नेले. मात्र, आता माझे कंपनीकडे थकीत रक्कम चार करोड सोळा लाख रुपये आहे. ती रक्कम देण्यास कंपनी तयार नाही. तसेच सदरील कंपनीने माझा बेकायदेशीरपणे करारनामा रद्द करुन माझी मेहनतीची, गरीब मजुरांची रक्कम थकीत ठेवली आहे. त्यामुळे माझ्या इथे काम करणाऱ्या मजुरांवर, माझ्यावर उपासमारीची वेळ आली आहे. तसेच आम्हाला मोठया प्रमाणात आर्थिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.'
न्यायालयात धाव पण तारीख पे तारीख : अमोल यांनी सांगितले की, 'या संदर्भात मी दिवाणी न्यायालयात देखील तक्रार दाखल केली असून कनिष्ठ दिवाणी न्यायालयात याचा खटला सुरू आहे. इथे थेट आनंद महिंद्रा यांच्यावर भारतीय दंडविधान कलम 420, कलम 406, कलम 419 आणि कलम 34 अंतर्गत तक्रार दाखल करण्यात आली आहे. हा विषय सध्या न्यायालयात सुरू असून न्यायालयाकडून आम्हाला फक्त तारखाच दिल्या जात आहेत. त्यात या सर्व कालखंडात न्यायालयीन प्रक्रियेवर होणारा खर्च देखील अधिक आहे. जो माझ्यासारख्या सामान्य माणसाला परवडत नाही.'
16 तारखेपासून उपोषण करणार : पुढे बोलताना अमोल कांबळे यांनी सांगितलं की, 'इतकं सर्व होत असताना या कंपनीचे मालक, संबंधीत व्यक्ती हे जाणुबुजून माझी फसवणुक करण्यासाठी माझी मेहनतीचे रक्कम देण्यास तयार नाहीत. त्यामुळे मी दिनांक 16/02/2023 रोजी सकाळी 9 वाजता बेमुदत आमरण उपोषण हे कंपनीच्या गेट समोर करणार आहे. कारण, कंपनीकडे माझ्या मेहनतीच्या पैशांसाठी इतक्या वेळा तगादा लावून सुद्धा त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळत नाहीये. त्यामुळे माझ्याकडे आता आमरण उपोषणाशिवाय कोणताही पर्याय नाही.'
महिंद्रा कंपनीचे म्हणणे काय? : यासंदर्भात कंपनीची बाजू जाणून घेण्यासाठी आम्ही महिंद्रा लाईफस्पेस या कंपनीच्या प्रवक्त्यांशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितलं की, 'आम्ही श्री अष्टविनायक कन्स्ट्रक्शनचे आरोप फेटाळतो आहे. त्यांच्या वागणुकीमुळे,त्यांच्या चूकीमुळे करार संपुष्टात आला. हे प्रकरण न्यायालयात प्रलंबित आहे कंपनीने त्यांच्याविरुद्ध दावा केला आहे. हे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट आहे.' असे ते म्हणाले.
हेही वाचा - IT Raid on BBC Office: बीबीसीच्या भारतातील कार्यालयांवर आयकर विभागाचे छापे.. कर्मचाऱ्यांचे फोन जप्त?