मुंबई - शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना लोकल प्रवासासाठी शासनाने परवानगी नाकारली असल्याने शिक्षकांना वर्क फ्रॉम होम करू द्या अन्यथा शिक्षक काम बंद आंदोलन करतील, असा इशारा भाजपा शिक्षक आघाडीने केला आहे. भाजपा शिक्षक आघाडीचे प्रदेश सहसंयोजक अनिल बोरनारे यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना याबाबत निवेदन दिले आहे.
मुख्यमंत्र्यांना लिहिलेले पत्र-
शासनाच्या आदेशानुसार दहावीच्या निकालाचे काम पूर्ण करणे आवश्यक आहे. याकरिता शाळेत जाण्यासाठी आपल्याला उपनगरीय रेल्वेतून प्रवासाची परवानगी मागत आहोत. परवानगी मिळवण्यासाठी पत्र देऊन विनंती केलेली आहे. सर्वच स्तरावर सतत प्रयत्न करत आहोत. मात्र अद्यापही रेल्वे प्रवासाची परवानगी मिळालेली नाही. आज सुद्धा शिक्षक लांब उपनगरातून शाळेत येण्यासाठी निघाले असता अनेक ठिकाणी त्यांना तिकिटे नाकारली. त्यामुळे शिक्षकांना आजदेखील खूप मनस्ताप सहन करावा लागला. एकतर प्रवासास परवानगी द्या, अन्यथा वर्क फ्रॉम होम करू देण्याचा निर्णय घ्या अन्यथा नाईलाजास्तव काम बंद आंदोलन करावे लागेल असे मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात अनिल बोरनारे यांनी म्हटले आहे.
शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे आर्थिक नुकसान -
आसनगाव, टिटवाळा, कल्याण-डोंबिवली, कर्जत, बदलापूर, अंबरनाथ, वसई-विरार, नवी मुंबईतून शाळेत येणाऱ्या शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना लोकल प्रवास सोयीस्कर पडतो. खासगी वाहनाने मुंबईत येण्यासाठी शिक्षकांना रोज २ ते ३ हजार खर्च करावा लागतोय. यामध्ये खासगी शाळेत अल्प वेतनावर काम करणाऱ्या शिक्षक-शिक्षकेतरांचे आर्थिक नुकसान होत आहे. इयत्ता पाचवी ते नववी व अकरावीच्या शिक्षकांना ५० टक्के उपस्थितीची सक्ती केली आहे. वास्तविक पाहता या शिक्षकांना वर्क फ्रॉम होम करून ऑनलाइन अध्यापन करणे शक्य असल्याने त्यांच्या ५० टक्के उपस्थितीचा आग्रह शालेय शिक्षण विभाग का करतेय, असा सवालही अनिल बोरनारे यांनी केला आहे. इयत्ता दहावीच्या शिक्षकांना दहावीच्या निकालासंदर्भातील कामे पूर्ण होईपर्यंत लोकल प्रवासास परवानगी द्यावी, १ जुले पासून त्यांनाही वर्क फ्रॉम करू द्यावे अशीही मागणी निवेदनात केली आहे.