मुंबई - उद्यापासून सुरू होणाऱ्या नीट, जेईई परीक्षेत महाराष्ट्रातील २.२ लाख विद्यार्थी सहभागी होणार आहेत. यातील सर्वात जास्त विद्यार्थी मुंबई महानगर प्रदेशातील आहेत. सध्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना उपनगरीय रेल्वेची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे, इतर वाहतूक व्यवस्था ही अपुरी पडत असल्याने विद्यार्थ्यांचे हाल होऊ नये, यासाठी विद्यार्थ्यांना रेल्वेने प्रवास मिळावा, म्हणून आमदार आशिष शेलार यांनी महाराष्ट्र भाजपकडून रेल्वेमंत्री व मुख्यमंत्री यांना पत्र लिहीत विनंती केली आहे.
रेल्वे मंत्री पीयूष गोयल याना लिहिलेल्या पत्रात शेलारांनी म्हटले की, विद्यार्थ्यांना उपनगरीय रेल्वेतून त्यांच्या परिक्षा प्रवेश पत्रावर प्रवास करण्याची परवानगी देण्यात यावी. या विनंतीबाबत आपल्याशी वैयक्तिक दूरध्वनीवरून झालेल्या बोलण्यात आपण या मागणीवर सकारात्मक भूमिका घेण्याचे मान्यही केले आहे. त्यानुसार महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांकडून पत्राव्दारे देखील मी लेखी मागणी आपल्याकडे करीत आहे.
याबाबत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात शेलार म्हणाले, की महाराष्ट्र सरकारने रेल्वे मंत्रालयाकडे औपचारिक निवेदन करून सर्व अधिकाऱ्यांना आदेश द्यावेत, जेणेकरून विद्यार्थ्यांना प्रवासात परवानगी मिळेल. यामुळे मुंबई उपनगरातील सुमारे ५० हजार विद्यार्थ्यांची होणारी गैरसोय दूर होऊन त्यांना सुरक्षित व वेळेत परिक्षेला पोहोचता येईल. त्यामुळे, तातडीने याबाबत निर्णय घ्यावा, अशी विनंती भाजप आमदार आशिष शेलार यांनी केली आहे.
हेही वाचा- 'मंदिरांची टाळी उघडायला हवीत, पण राजकीय मनःशांतीसाठी नकोत'