मुंबई - महानायक अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन यांना काल शनिवारी कोरोना झाल्याचे समोर आले होते. याबाबत आज मुंबई महापालिकेला माहिती मिळताच त्यांच्याजवळच्या नातेवाईकांची टेस्ट केली. यावेळी सिनेतारका ऐश्वर्या बच्चन व मुलगी आराध्या अभिषेक बच्चन या दोघीही कोरोना पॉझिटिव्ह आल्या आहेत. बच्चन कुटुंबातील चारजण कोरोना पॉझिटिव्ह आल्याने ते राहत असलेले चार बंगले महापालिकेने सील केले आहेत. तर, ऐश्वर्या व आराध्या यांना जलसा बंगल्यातच होम क्वारंटाइन करण्यात आले आहे.
अमिताभ बच्चन यांनी खोकला आणि कफ असल्याने त्यांनी आपली कोरोना टेस्ट केली होती. या दरम्यान त्यांच्या कुटुंबीयांचीही टेस्ट करण्यात आली होती. त्यात अमिताभ व अभिषेक बच्चन हे दोघे कोरोना पॉझिटिव्ह आले होते. मात्र त्यांच्या कुटुंबातील जया बच्चन, ऐश्वर्या, आराध्या यांच्या टेस्ट निगेटिव्ह आल्या होत्या. कोरोना पॉझिटिव्ह आल्यावर अमिताभ आणि अभिषेक बच्चन यांना नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्या दोघांचीही प्रकृती स्थिर आहे. तर, अमिताभ आणि अभिषेक बच्चन हे कोरोना पॉझिटिव्ह आल्याने पालिकेच्या आरोग्य विभागाने त्यांच्या जवळच्या नातेवाईकांची टेस्ट केली असता त्यात ऐश्वर्या राय बच्चन व आराध्या बच्चन या दोघीही कोरोना पॉझिटिव्ह आल्या आहेत तर जया बच्चन यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला असल्याची माहिती पालिकेकडून देण्यात आली आहे.
यामुळे, बच्चन कुटुंबीय राहत असलेले जलसा, प्रतीक्षा, जनक, वत्सा हे चारही बंगले सॅनिटाइझ करण्यात आले असून ते प्रतिबंधित क्षेत्र घोषित करून सील करण्यात आले आहे. तर, ऐश्वर्या व आराध्या या दोघींना कोरोनाची लक्षणे नसल्याने त्यांना घरीच होम क्वारंन्टाइन करण्यात आले आहे. तसेच बच्चन यांच्या बंगल्यात काम करणाऱ्या 54 कर्मचाऱ्यांचे स्क्रीनिग करून टेस्टिंग करण्यात आले आहे. जलसा बंगल्यात क्वारंटाइनसाठी जागा असल्याने त्यांना तेथेच क्वारंटाइन करण्यात आल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे.