नवी मुंबई - रात्रीचा फायदा घेत तळोजा एमआयडीसीमधील काही कंपन्या विषारी वायू हवेत लपून सोडतात. त्यामुळे तळोजा पनवेल खारघर परिसरात सकाळी फिरणे फायदेशीर नव्हे, तर अपायकारक ठरू शकते. कारण नवी मुंबई परिसरात हवेतील प्रदूषण पातळी प्रमाणाच्या बाहेर वाढल्याने याचा परिणाम त शरीरावर होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. वातावरण फाऊंडेशन या पर्यावरण संस्थेने केलेल्या हवेच्या गुणवत्तेत प्रदूषण पातळी चक्क 60 पीएमवरुन 200 पीएमवर पोहोचली आहे. हवेतील प्रदूषण तिप्पटीने वाढल्याचे सर्वेक्षणातून समोर आले आहे.
केमिकल्स कंपन्यांच्या माध्यमातून सोडला जातोय विषारी धूर -
नवी मुंबई, पनवेल परिसरात मागील काही वर्षात वायू प्रदूषणात चांगलेच वाढले आहे. तळोजा एमआयडीसीमधील केमिकल कंपन्यांमधून रात्री हवेत विषारी गॅस सोडले जातात. सद्यस्थितीत मोठ्या प्रमाणावर सुरू असलेले नवीन बांधकाम, वाहनांमधून निघणारा धूर यामुळे प्रदूषणाची पातळी धोक्याच्या वर जाऊन पोहोचली आहे.
वातावरण फाऊंडेशनने बसवल्या एअर क्वॉलिटी मॉनिटर मशीन -
वातावरण फाऊंडेशनने महिनाभर हवेची गुणवत्ता तपासण्यासाठी एअर क्वॉलिटी मॉनिटर मशीन बसवल्या होत्या. त्यानुसार हवेची गुणवत्ता तपासण्यात आली. यावेळी पनवेल (113.1 पीएम), तळोजा एमआयडीसी (197.4 पीएम), नावडे (130.5 पीएम), खारघर(136.4 पीएम) या ठिकाणी बसवलेल्या मशीनमध्ये हवेची गुणवत्ता खालावल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. सलग महिनाभर तपासलेल्या हवेच्या गुणवत्तेत चक्क 200 पीएमपर्यंत प्रदूषणाची पातळी नोंदवली गेली आहे.
नवी मुंबई परिसरात प्रदूषण तिप्पट वाढले -
60 पीएमवरून 200 पीएम वर इतके तिप्पट प्रमाणात हवेतील प्रदषण वाढल्याचे केलेल्या तांत्रिक सर्वेतून समोर आले आहे. थंडीमुळे पहाटे उठून मॉर्निंग वॉक करणाऱ्यांच्या संख्येत वाढ होत आहे . नवी मुंबई परिसरातील तळोजा खारघर पनवेल परिसरात सकाळचे धुके नसून प्रदूषणाचे कण असल्याचेही वातावरण फाऊंडेशनच्या माध्यमातून सांगण्यात येत आहे. मॉर्निंग वॉक करताना थकवा जाणवणे, अशा गोष्टी घडत असून, केमिकलयुक्त वास येत असल्याने नागरिक बेजार झाले आहेत. त्यामुळे प्रदूषणात भर घालणाऱ्या कंपन्यांवर, कन्स्ट्रक्शन साईटवर, कडक कारवाई करावी, अशी मागणी पुढे येत आहे.
हेही वाचा - अपघातग्रस्त केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांची उपराष्ट्रपतींनी घेतली भेट