मुंबई - गेली काही दिवस विश्रांती घेतलेल्या पावसाने मुंबईत पुन्हा जोर धरला आहे. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी पावसाने दमदार सुरुवात केली आहे. मुंबईसह उपनगरात सर्वत्र पाऊस पडत आहे. मुंबईतल्या अनेक ठिकाणी असलेल्या सखल भागांमध्येही पाणी साठण्यास सुरुवात झाली आहे. पावसामुळे वाहतुकीवर परिणाम झाला आहे. मुंबई छत्रपती शिवाजी महाराज विमानतळावरची उड्डाणे थांबवण्यात आली आहेत.
आज सकाळपासून पावसाच्या मुसळधार सरी कोसळत होत्या. रात्रीपासून पडणाऱ्या पावसाचा जोर सकाळी वाढला आहे. यामुळे मुंबईतील जनजीवन पुन्हा एकदा विस्कळीत होण्याची चिन्हे आहेत.
आज आलेल्या जोरदार पावसामुळे मध्य रेल्वेची लोकल पंधरा ते वीस मिनिटांनी उशिरा धावत आहे. हार्बर मार्गावर वडाळा स्थानकावरील लोकलमध्ये बिघाड झाला होता. यामुळे या मार्गावरील वाहतूक काही काळ खोळंबली होती. सध्या हार्बर लोकल 15 मिनिटे उशिराने धावत आहे.