मुंबई - लोकसभेच्या निवडणुका आता पार पडल्यास महाविकास आघाडीला किमान 34 जागा निवडून येतील, असा सर्वे एका नामांकित सर्वे कंपनीने केला आहे. मात्र, 34 नाही तर, जवळपास 40 जागा लोकसभेच्या निवडणुकीत निवडून येतील अशी परिस्थिती सध्या राज्यात आहे. राज्यातले नागरिक निवडणुकांची वाट पाहत आहेत. लोकांनी ठरवले तर ते 48 च्या 48 लोकसभेच्या जागाही निवडून येऊ शकतील, असे विधान शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले आहे.
अद्वेत हिरे ठाकरे गटात - मालेगावचे भारतीय जनता पक्षाचे नेते अद्वेत हिरे यांनी आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला. शिवसेना भवन येथे हा पक्ष प्रवेश झाला असून, यावेळी उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत, खासदार विनायक राऊत हे उपस्थित होते. मालेगावातले अद्वेत हिरे हे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात आल्यानंतर 'हिरे आले आणि गद्दार गेले' असा चिमटाही बंडखोर आमदारांना उद्धव ठाकरे यांनी काढला.
पुढील महिन्यात मालेगावात जाहीर सभा - अद्वेत हिरे यांच्या पक्षप्रवेशानंतर उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना आपण पुढील महिन्यात मालेगावात जाहीर सभा घेऊ, असे आश्वासन उद्धव ठाकरे यांनी दिले आहे. अद्वेत हिरे यांना संपूर्ण उत्तर महाराष्ट्राची जबाबदारी उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिली. आपल्यासोबत असताना हातात असलेल्या अन्नाची शपथ घेऊन आपण शिवसेनेसोबत कधीही गद्दारी करणार नाही असे म्हटलेले लोक देखील गद्दारी करून गेली, असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी नाव न घेता दादा भुसे यांना टोला लगावला.
घाणेरडा पायंडा - बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना ही भारतीय जनता पक्षाची पालखी उचलण्यासाठी केलेली नाही, तर हिंदुत्वाची पालखी उचलण्यासाठी शिवसेनेची स्थापना त्यांनी केली. त्यामुळे गद्दारांना यापुढील वेळेत धडा शिकवला जाईल, असा इशारा पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांनी यावेळी संभाषण करताना दिला आहे. तसेच देशाच्या राजकारणात भारतीय जनता पक्षाने घाणेरडा पायंडा पाडून ठेवला आहे. भारतीय जनता पक्षाने पाडलेला पायंडा देखील आपल्याला तोडायचा आहे, असे आवाहन उपस्थित सर्व कार्यकर्त्यांना उद्धव ठाकरे यांनी केला.