मुंबई : शिवसेना नेत्यांनी युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे आज बिहार दौऱ्यावर ( Aditya Thackeray visit Bihar ) असणार आहेत. हा एक दिवसीय दौरा असून बिहारचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांची यावेळी भेट घेणार (Aditya Thackeray meet Tejashwi Yadav ) आहेत. मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकांच्या ( BMC elections preparations ) तोंडावर ही भेट होत असल्याने राजकीय वर्तुळात चर्चेचे फड रंगू लागले आहेत. दरम्यान निघण्यापूर्वी आदित्य ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, बिहारचे उपमुख्यमंत्री चांगले काम करत आहेत. आदित्य ठाकरे यांनी बिहारला जाण्यापूर्वी आज स्पष्ट केले की, तुम्हाला माहिती आहे आज मी बिहार दौऱ्यावर जात आहे. मी आणि तिथले उपमुख्यमंत्री एकाच वयाचे आहोत. ते उपमुख्यमंत्री म्हणून चांगले काम करत आहेत. त्यामुळे क्लाईमेंट चेंज आणि पर्यावरण या विषयावर चर्चा करू. तसेच माझा काही अजेंडा नाही. आम्ही फोनवर बोलत होतो. आम्ही सत्तेत ते विरोधात असताना अनेकवेळा बोलणे झाले होते. आज प्रत्यक्ष भेटणार आहे असे आदित्य ठाकरे यांनी सांगितले.
शिवसेनेत फूट पडल्यानंतर कट्टर विरोधक असलेल्या पक्षांसोबत शिवसेना ठाकरे गटाचे संबंध दिवसेंदिवस मजबूत आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला आदित्य ठाकरे यांनी नुकतीच हजेरी लावली होती. आज आदित्य ठाकरे बिहार दौऱ्यावर जाणार आहेत. हा एकदिवसीय दौरा असणार आहे. दरम्यान, उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांची भेट घेणार आहेत. शिवसेना सचिव, खासदार अनिल देसाई व शिवसेना उपनेते खासदार प्रियंका चतुर्वेदी तसेच काही प्रमुख पदाधिकारी यावेळी उपस्थित असणार आहेत. मुंबई मनपाच्या आगामी निवडणुका तोंडावर आल्या आहेत. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाकडून मोर्चे बांधणी सुरू झाली आहे. आदित्य ठाकरे यांचा बिहार दौरा हा एक त्याचाच भाग असल्याचे बोलले जाते.
मुंबईत बिहारच्या नागरिकांचे प्रमाण जास्त महाराष्ट्रात भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शिवसेनेने महाविकास आघाडी स्थापन केली. हा प्रयोग अडीच वर्षे चांगला चालला. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीने महाविकास आघाडी सरकारला पायउतार व्हावे लागले. तर बिहार मध्ये नितेश कुमार यांनी भाजपशी असलेली युती तोडून राष्ट्रीय जनता दलासोबत सरकार स्थापन केले. नितेश कुमार मुख्यमंत्री तर तेजस्वी यादव उपमुख्यमंत्री झाले. नव्या गटबंधनामुळे भाजपला मोठा हादरा बसला. मुंबईत मोठ्या प्रमाणात बिहार राज्यातील लोकसंख्या आहे. मुंबईत भाजपला रोखण्याचे आव्हान आहे. आदित्य ठाकरे यांचा दौरा यामुळे महत्त्वाचा मानला जातो आहे. मात्र, आदित्य ठाकरे आणि तेजस्वी यादव यांच्या भेटीत काय चर्चा होणार पाहणे महत्त्वाचे असणार आहे.