मुंबई Adani Group Flats in Dharavi : झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पांतर्गत झोपडीधारकांना 300 चौरस फुटाच्या सदनिकांमध्ये पुनर्वसन केले जात असताना, धारावी प्रकल्पातील (Dharavi Project Flats) झोपडपट्टीवासीयांना मात्र मोठ्या जागेच्या घरांचा लाभ मिळणार आहे. धारावी झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पातील कार्यक्रमात साडेतीनशे चौरस फुटाची सदनिका देण्यात येणार असल्याची घोषणा अदानी समूहाकडून करण्यात आलीय.
17 टक्के अधिक क्षेत्रफळ धारावीकरांना मिळणार : मुंबईतील सर्वांत मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावी पुनर्वसन प्रकल्पातील झोपडीधारकांना आता तीनशे पन्नास चौरस फुटाची सदनिका देण्यात येणार आहे. या सदनिकेत स्वतंत्र शौचालय आणि स्वयंपाकघर असणार आहे. त्यामुळं मुंबईतील अन्य झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पांपेक्षा 17 टक्के अधिक क्षेत्रफळ धारावीकरांना मिळणार असल्याची माहिती धारावी पुनर्वसन प्रकल्प प्रायव्हेट लिमिटेडचे जनसंपर्क प्रमुख मकरंद गाडगीळ यांनी दिली.
पात्र निवासीधारकांना सदनिका : राज्य शासनाच्या धोरणानुसार 1 जानेवारी 2000 पूर्वी अस्तित्वात असलेल्या झोपड्या या पात्र मानल्या जाणार आहेत. या पात्र झोपड्यांना सदनिका वितरित करण्यात येणार असून या सदनिका सुरक्षित असल्या बरोबरच त्या हवेशीर आणि उत्तम प्रकाश असलेल्या आरोग्यदायी असतील, असा दावाही कंपनीनं केलाय.
धारावीकरांना दिल्या जाणार 'या' सुविधा : धारावीची औद्योगिक ओळख अबाधित ठेवून धारावीच्या व्यावसायिक परिसराला जागतिक स्तरावर जोडण्याचा कंपनीचा प्रयत्न असणार आहे. धारावीकरांचं जीवनमान उंचावणं, भविष्य घडवणारे शिक्षण, आर्थिक संधी, आधुनिक आरोग्य सुविधा आणि व्यावसायिक प्रशिक्षण तसेच दर्जेदार जीवनशैली हे सारं नव्या धारावीत उपलब्ध असेल. धारावीकरांसाठी सामाजिक सभागृह, मनोरंजन पार्क, सार्वजनिक विद्यालय आणि दवाखाने तसेच मुलांसाठी संगोपन केंद्र देखील असणार आहेत, असंही गाडगीळ यांनी स्पष्ट केलंय.
अपात्र निवासी सदनिकाधारकांनाही सुविधा : धारावीतील अपात्र निवासी सदनिकाधारकांना राज्य शासनानं निश्चित केलेल्या धोरणांचा प्रस्तावित परवडणाऱ्या भाड्याच्या गृहनिर्माण धोरणांतर्गत निवासस्थान देण्यात येणार आहे. यासाठी मोठ्या संख्येनं झोपड्यांमध्ये असलेल्या रहिवाशांच्या गरजा लक्षात घेऊन नव्या धारावीमध्ये विकास करण्यात येणार आहे, असंही गाडगीळ यांनी सांगितलं.
हेही वाचा: