मुंबई Mahadev Betting App Case : महादेव ऑनलाइन सट्टेबाजी प्रकरणात विशेष तपास पथकानं (एसआयटी) अभिनेता साहिल खान, त्याचा भाऊ सॅम खान, हितेश खुशलानी, अमित शर्मा यांना समन्स बजावलं होतं. त्यांना आज चौकशीसाठी हजर बोलवण्यात आलं होतं. मात्र, अभिनेता साहिल खान यांच्यासह तिघेही चौकशीसाठी गैरहजर होते.
तिघांची चौकशीला दांडी : अभिनेता साहिल खान, इतर तिघांना काल एसआयटीसमोर हजर राहण्यासाठी समन्स बजावण्यात आल्याची माहिती मुंबई पोलीस दलातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली होती. मात्र, महादेव बेटिंग ॲप प्रकरणात अभिनेता साहिल खान याच्यासह तिघांनी चौकशीला दांडी मारली आहे. साहिल खान चौकशीसाठी हजर झाला नसल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली. महादेव बेटिंग ॲप प्रकरणात पुन्हा त्यांना चौकशीसाठी समन्स बजावण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
एकूण 32 जणांविरुद्ध एफआयआर दाखल : महादेव बेटिंग ॲपची चौकशी करणाऱ्या एसआयटीला (विशेष तपास पथक) साहिल खानवरील आरोपांबाबत त्याची बाजू जाणून घ्यायची आहे. या प्रकरणी माटुंगा पोलिस ठाण्यात एकूण 32 जणांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. एसआयटीच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, साहिल खानसह इतर 36 जणांविरुद्ध तपास सुरू आहे. या तपासात त्यांची बँक खाती, मोबाईल, लॅपटॉप, सर्व तांत्रिक उपकरणं तपासली जात आहेत. या प्रकरणात सहभागी असलेल्यांनी 67 वेगवेगळ्या बेटिंग साइट्स स्थापन केल्या असून त्याद्वारे लोक बेकायदेशीरपणे सट्टा लावतात. आरोपींनी पैसे काढण्यासाठी, जमा करण्यासाठी 2000 हून अधिक सिमकार्डचा वापर केला आहे. हे सिमकार्ड खरेदी करण्यासाठी बनावट कागदपत्रांचा वापर करण्यात आला आहे. 15 हजार कोटी रुपयांच्या महादेव बेटिंग ॲप प्रकरणात मुंबईतील माटुंगा पोलिसात एफआयआर दाखल करण्यात आला होता, जो पुढील तपासासाठी मुंबई गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे.
हेही वाचा -