मुंबई- मुंबईची लाईफलाईन मानली जाणारी लोकल रेल्वे ही सामान्य नागरिकांसाठी १ फेब्रुवारीपासून मर्यादित वेळेत सुरू करण्यात आलेली आहे. पहाटेच्या पहिल्या लोकलला सुरुवात झाल्यानंतर सकाळी ७ वाजेपर्यंत, दुपारी १२ ते दुपारी ४ वाजेपर्यंत व रात्री ९ ते शेवटच्या लोकल पर्यंत सामान्य नागरिकांना लोकल रेल्वे प्रवास करण्याची मुभा देण्यात आलेली आहे .मात्र, या वेळे व्यतिरिक्त इतर वेळेत प्रवास करणाऱ्या सामान्य प्रवाशांच्या विरोधात कलम १८८ व रेल्वे कायद्यानुसार कारवाई रेल्वे पोलिसांकडून केली जाईल, असा इशारा देण्यात आलेला आहे.
सुरक्षारक्षकांचा अतिरिक्त ताफा
कोरोना संक्रमणामुळे बर्याच महिन्यांपासून बंद राहिलेल्या लोकल रेल्वेचे दरवाजे सामान्य नागरिकांसाठी उघडण्यात आले आहे. त्यामुळे या वेळी होणाऱ्या गर्दीचे नियोजन करण्यासाठी लोकल रेल्वेला २६५० सुरक्षारक्षकांचा ताफा तैनात करण्यात आला आहे. देयामध्ये २००० होमगार्ड व ६५० सुरक्षा महामंडळाचे जवान बंदोबस्तास ठेवण्यात येणार आहे.
लांबच्या पल्ल्यांच्या प्रवाश्यांची गैरसोय
रेल यात्री परिषदेचे सुभाश गुप्ता यांनी लोकल सुरु करण्याच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. मात्र, बोरिवली, ठाणे व इतर लांबच्या परिसरातून येणाऱ्या सामान्य नागरिकांसाठी त्यांच्या खासगी कार्यालयात पोचताना ही वेळ योग्य नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच राज्य शासनाकडून लोकलसाठी ठरवून देण्यात आलेली वेळ योग्य नसून सरसकट पूर्ण दिवस सामान्य नागरिकांना, श्रमिकांना, खासगी कार्यालयातील कर्मचाऱ्यांना लोकलने प्रवास करू द्यावा, अशी मागणी रेल यात्री परिषदेकडून करण्यात आलेली आहे.