मुंबई : गेल्या काही दिवसांपासून महिलांचे सोशल मीडिया वापरण्याचे प्रमाण वाढले आहे. या सोशल मीडियाच्या अतिवापरामुळे सायबर गुन्ह्यांमध्ये सुद्धा दिवसेंदिवस झपाट्याने वाढ होत आहे. महिलांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून त्यांच्याकडून पैसे उकाळणे. महिलांचे फेसबूक अकाउंट हॅक करुन पैसे उकाळणाऱया एका आरोपीचा व्ही.पी. पोलिसांनी छडा लावला आणि त्याला लातूरमध्ये अटक केली आहे. अजय उर्फ विनोद मुंडे (वय 25) असे आरोपीचे नाव आहे. हा आरोपी गेल्या चार दिवसांपासून पोलिसांना चकवा देत होता, शेवटी पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या आहेत.
अशाप्रकारे करायचा फसवणूक : या प्रकरणाची सविस्तर माहिती पोलीस उपनिरीक्षक राहुल पाटील यांनी दिली आहे. उपनिरीक्षक पाटील म्हणाले की, ग्रामीण भागातील या आरोपीची गुन्ह्यातील मोडस ऑपरेंडी वेगळ्या पद्धतीची होती. गेली तीन वर्षे हा आरोपी अनेक महिलांसोबत मैत्री करुन त्यांच्याकडून पैसे उकाळत होता. एखाद्या महिलेला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवत असायचा. त्या महिलेच्या फ्रेंडलिस्ट मधील अजून एका महिलेला मेसेज करायचा. मेसेंजरवर आरोपी एक लिंक पाठवत असायचा. त्या लिंकद्वारे त्या महिलेची माहिती भरण्यास सांगितल्यानंतर आपोआप मेसेज केलेल्या महिलेचे फेसबुक अकाउंट हॅक करत असायचा. अशाप्रकारे आरोपी अजय मुंडेने 24 महिलांची फसवणूक केली आहे.
पॉर्न साईटवर फोटो असल्याची बतावणी : फेसबूक हॅक झाल्यानंतर आरोपी संबंधित महिलेला तिचे फोटो पॉर्न साईटवर अपलोड झाले आहेत, असे माहिती द्यायचा. त्यानंतर स्वत: आरोपी त्या महिलेला त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग सांगायचा. एक अॅप आहे, त्यातून ते फोटो पॉर्न साईटवरुन काढता येतात. याची खात्री तो महिलेला देत असायचा. पण हे अॅप घेण्यासाठी 5 ते 7 हजार रुपयांचे रिचार्ज करावे लागेल, असे आरोपीने महिलांना सांगायचा. आपली बदनामी टाळण्यासाठी संबंधित महिला 5 ते 7 हजार रुपये आरोपीने दिलेल्या मोबाईल क्रमांकावर डिजिटल अॅपच्या द्वारे पाठवत.
प्रायव्हेट पार्टचे फोटो मागायचा : आरोपी महिलांकडे पॉर्न साईटवरील छायाचित्रे डिलीट करण्याकरता पीडित महिलांकडून त्यांच्या खासगी भागांचे फोटोदेखील पाठवण्यास सांगायचा. मात्र काही महिलांनी त्याला फोटो दिले तर काही महिलांनी दिले नाहीत. कोरोना संकट काळात जारी करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे नागरिक घरात बसून या नागरिकांपैकी एक असलेल्या अजय मुंडे हा देखील सतत सोशल मीडियावर मैत्रिणीना तो टार्गेट करू लागला. तुमचा फोटो, व्हिडीओ पॉर्न साईट्सवर वायरल झाल्याचे त्यांना सांगू लागला. हे ऐकताच क्षणी महिला हादरून जात. त्या महिलांना धीर देत त्यांचे फोटो आणि व्हिडिओ डिलीट करण्यासाठी तो 5 ते 7 हजारांची मागणी करायचा. समाजात बदनामी टाळण्यासाठी व्हॉट्सअॅपवर प्राप्त होणाऱ्या माहितीनुसार आरोपीच्या बँक खात्यावर महिला पैसे पाठवत. त्यानंतर आरोपी संबंधित महिलेची अजिबात संपर्क ठेवत नसायचा.
चार दिवसात पकडला आरोपी : व्ही. पी. रोड पोलीस ठाण्यात या प्रकाराची तक्रार दाखल झाल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राहुल पाटील आणि त्यांच्या पथकाने तांत्रिक तपास करून आरोपीला शोधू काढले. पोलिसांनी तयार केलेल्या पथकातील पोलीस कर्मचारी रूपेश परब, संकेत तावडे हे लातूरला रवाना झाले आणि त्यांनी सलग 4 दिवस सापळा लावून आरोपी अजय ऊर्फ विनोद मुंडे याच्या मुसक्या आवळल्या. या गुन्ह्यांमध्ये वापरण्यात आलेले बँक खातेही बोगस कागदपत्रांद्वारे उघडण्यात आले होते. तसेच बँकेची डिटेल पाठवण्यासाठी आरोपीने मुंबईतील एका महिलेचा व्हॉट्सअॅप नंबरही हॅक केला होता.
कोकणात देखील दोन गुन्हे दाखल : याआधी देखील आरोपी मुंडे आला अशाच प्रकारच्या प्रकरणामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यात दोन गुन्ह्यांमध्ये अटक झाली होती. सिंधुदुर्ग पोलिसांनी अटक केल्यानंतरही आरोपी मुंडे हाच गुन्हा परत करू लागला होता. कारवाईदरम्यान या आरोपीचा मोबाईल पोलिसांनी तपासला असता त्यात २४ महिलांचे फेसबूक अकाऊंट लॉगइन केल्याचे निष्पन्न झाले आहे. दरम्यान इतर महिलांची अशाप्रकारे फसवणूक झाली असेल त्यांनी त्वरित व्ही. पी. रोड पोलिसांशी संपर्क साधावा, तसेच सोशल मीडियाचा वापर करताना मेसेजद्वारे येणाऱ्या कोणत्याही लिंकवर क्लिक करू नका, अन्यथा अशा प्रसंगाला सामोरे जावे लागू शकते. त्यामुळे वेळीच धोका ओळखून लिंकला क्लिक करणे टाळा, असे आवाहन तपास अधिकारी राहुल पाटील यांनी नागरिकांना केले आहे.
हेही वाचा -