मुंबई : शिवसेनेमध्ये दोन गट पडल्यानंतर ठाकरे आणि शिंदे असे दोन गट तयार झाले. सध्या ठाण्यातील ठाकरे गटातील खासदार राजन विचारे यांना सिक्युरिटी कमी केल्यामुळे धोका आहे. त्या पार्श्वभूमीवर त्यांना सिक्युरिटी वाढवून देण्यात यावी अशी मागणी फौजदारी याचिका मार्फत करण्यात आली आहे. ही याचिका खासदार राजन विचारे यांनी वकील नितीन सातपुते यांच्यामार्फत उच्च न्यायालयात आज दाखल केली आहे. दरम्यान, या याचिकेवर राज्य सरकारला उत्तर दाखल करण्याचे निर्देश न्यायमूर्ती ए. एस. गडकरी आणि न्यायमूर्ती प्रकाश डी. नाईक यांच्या खंडपीठाने दिली आहे. पुढील सुनावणी 31 जानेवारी रोजी होणार आहे.
सिक्युरिटी देण्याची मागणी : या याचिकेवर न्यायमूर्ती ए.एस. गडकरी आणि न्यायमूर्ती प्रकाश डी. नाईक त्यांच्या खंडपीठांसमोर सुनावणी झाली आहे. या याचिकेत प्रतिवादी म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच राज्याचे गृहसचिव आणि ठाणे जिल्ह्याचे पोलीस आयुक्त यांची प्रतिवादी म्हणून उल्लेख आहे. राजन विचारे यांच्या जीवाला धोका असल्याने त्यांना तात्काळ सिक्युरिटी देण्यात यावी अशी मागणी या याचिकेद्वारे करण्यात आली आहे.
अद्याप कुठलीही पत्रावर कारवाई नाही : यापूर्वी देखील शिंदे विरुद्ध ठाकरे गटात पाण्यात झालेल्या वादात राजन विचारे यांच्यासह ठाकरे गटातील अनेक पदाधिकाऱ्यांविरोधात पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले होते. राजन विचारे यांना पक्षान निमित्त तथा सामाजिक कामाकरिता दूर-दूरपर्यंत प्रवास करावा लागतो. त्यामुळे त्यांना सिक्युरिटी देण्यात यावी यासंदर्भात त्यांनी ठाणे पोलीस आयुक्त यांना पत्र देखील दिले होते. मात्र, अद्याप कुठलीही पत्रावर कारवाई करण्यात आली नसल्याने, अखेर मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे.
कोण आहेत राजन विचारे? नंदिनी विचारे यांचे पती राजन विचारे ठाण्याचे शिवसेनेचे खासदार आहेत. जवळपास 30 वर्षांपासून ते शिवसेनेत सक्रिय आहे. ठाण्याचे शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांचे ते समर्थक होते. तसेच, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचेही ते जवळचे नेते मानले जातात. राजन विचारे (1992 ते 2012) या कार्यकाळात चार टर्म शिवसेनेचे नगरसेवक म्हणून निवडून आले. तसेच, (2007 ते 2008) या काळात ते ठाणे महानगरपालिकेचे महापौर होते. (2009 ते 2014)ते ठाण्यात आमदार म्हणून निवडून आले. तसेच, ते याचिका समिती सदस्य, उद्योग स्थायी समिती सदस्य अशा विविध समित्यांमध्येही कार्यरत होते. आता ते शिवसेनेचे लोकसभेचे मुख्य प्रतोद आहेत. राजन विचारे शिंदे गटात जाणार की उद्धव ठाकरे यांना आपले समर्थन कायम ठेवणार हे अद्याप स्पष्ट नाही.