मुंबई - येथील गोवंडी परिसरातील बैंगनवाडी रोड नंबर 13 येथे गुरुवारी दुपारी एका युवकाने 4 लोकांवर चाकूने अचानक हल्ला केला. यात एका युवकाचा मृत्यू झाला असून ३ जण गंभीर जखममी झाले आहेत. जयेश गुप्ता असे मृताचे नाव आहे. तर, उर्वरीत तिन्ही जखमींना उपचारासाठी गोवंडीच्या शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सदर आरोपीस पोलिसांनी अटकेत घेतले आहे. सदर आरोपीचे नाव अरविंद यादव (रा. शिवाजीनगर )असे आहे.
गोवंडीच्या बैंगनवाडी रोड नंबर 13 येथे गुरुवारी दुपारी साडेतीनच्या दरम्यान आरोपी अरविंद हा नशेत असताना गोवंडीच्या भर बाजारात चाकू घेऊन लोकांना भीती दाखवत होता. तो शेजारी राहणाऱ्या एका महिलेचा राग मनात ठेवून होता. ती महिला त्याच वेळी त्याच्यासमोर आली त्याने अचानक त्या महिलेस चाकूने वार करून गंभीर जखमी केले. दरम्यान लोकांनी मध्यस्थी करून त्या महिलेस वाचविले. मात्र, आरोपीने मध्यस्थी करणाऱ्या लोकांवरच चाल करून हातातील चाकूने हल्ला करत धाव घेतली. यादरम्यान १ युवक २ महिला आरोपीच्या समोर येताच त्याने जयेश गुप्ता या युवकाच्या छातीमध्ये चाकू खुपसला. गंभीर जयेशला तातडीने पोलिसांनी शताब्दी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. दरम्यान बैंगनवाडी, गोवंडी परिसरातील लोकांचा मोठा जमाव शताब्दी रुग्णालयाच्या परिसरात जमा झाला होता. याठिकाणी लोकांनी पोलिसांच्या विरोधात घोषणाबाजी सुद्धा केली. तसेच जबाबदार असणाऱ्या पोलिसांना आणि आरोपीला कठोर शिक्षा करावी अशी मागणी केली आहे.
हेही वाचा - ईव्हीएमवर ‘सेव्ह आरे’चे बटण ठेवा - आंदोलकांची मागणी
हेही वाचा - राहुल गांधींच्या प्रचार तोफा रविवारी धडाडणार; लातूरमध्ये १, तर मुंबईत २ सभा