मुंबई - मुंबईमध्ये साचणारे पाणी समुद्रात सोडण्यासाठी व पाण्याचा निचरा होण्यासाठी गटारे बनवण्यात आली आहेत. ही गटारे साफ करता यावीत यासाठी मॅनहोल आहेत. मुंबईत असे एकूण ७३ हजारांवर मॅनहोल आहेत. पावसाचे पाणी साचल्यास मॅनहोल उघडे ठेवले जाते. त्यामध्ये नागरिक पडू नयेत म्हणून फक्त १३९६ मॅनहोलवरच लोखंडी जाळ्या बसवण्यात आल्या आहेत. याची माहिती पालिकेच्या पर्जन्य जलवाहिन्या विभागाकडून देण्यात आली आहे.
मॅनहोलकडे लक्ष
'मुंबईमध्ये दरवर्षी पावसाचे पाणी साचते. साचलेले पाणी समुद्रात लवकर जावे यासाठी गटारे बांधली आहेत. त्यांच्या स्वच्छतेसाठी आणि पाण्याचा निचरा करण्यासाठी मॅनहोल निर्माण करण्यात आले आहेत. या मॅनहोलमध्ये आत जाऊन गटारे साफ केली जातात. तसेच पावसाचे साचलेले पाणी या मॅनहोलमधून गटारांच्याद्वारे पम्पिंग स्टेशनच्या समुद्रात सोडले जाते. पावसाळ्यात हे मॅनहोल उघडले जातात. साचलेली पाणी कमी झाल्यावर ते पुन्हा बंद केले जातात. उघड्या मॅनहोलजवळ पालिकेचे कर्मचारी तैनात केले जातात. तर काही ठिकाणी पाण्याचा निचरा होण्यासाठी स्थानिक नागरिक मॅनहोल उघडतात. मात्र, ते बंद करत नाहीत. त्यामुळे उघड्या मॅनहोलमध्ये पडून नागरिकांचा मृत्यू झाल्याच्या घटना शहरात घडल्या आहेत. म्हणून मॅनहोलच्या सुरक्षेकडे पालिकेने विशेष लक्ष दिले आहे', असे पालिका अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे.
...म्हणून बसवल्या मॅनहोलवर जाळ्या
ऑगस्ट २०१७मध्ये झालेल्या अतिवृष्टीत पोटविकार तज्ज्ञ डॉ. दीपक अमरापूरकर यांचा मॅनहोलमध्ये पडून मृत्यू झाला होता. त्यावेळी धोकादायक मॅनहोलचा प्रश्न ऐरणीवर आला. अतिवृष्टी झाल्यास काही ठिकाणी साचणार्या पाण्यात मॅनहोल उघडे असल्यास दुर्घटना घडण्याची शक्यता असते. या पार्श्वभूमीवर शहर आणि दोन्ही उपनगरातील मॅनहोलवर जाळ्या बसवून ते सुरक्षित करण्यात आले आहेत.
समाजकंटकांचे आव्हान
'पालिकेचा पर्जन्य जलवाहिन्या विभाग, मलनिस्सारण वाहिन्या खाते, मलनिस्सारण प्रचालन खाते, जल अभियंता खाते, सांडपाणी अशा विविध खात्यांशी संबंधित मुंबईत विविध ठिकाणी एक लाखांवर मॅनहोल आहेत. देखभाल-दुरुस्ती आणि सफाईसाठी कंत्राटदार, पालिका कर्मचार्यांकडून हे मॅनहोल उघडण्यात येतात. मात्र, हे मॅनहोल उघडे राहिल्यास दुर्घटना घडून जीवितहानी होण्याचा धोका असतो. या पार्श्वभूमीवर मुंबईतील सर्व मॅनहोलवर संरक्षक लोखंडी जाळ्या बसवण्यात येत आहेत. काही ठिकाणी समाजकंटकांकडून पालिकेने मॅनहोलवर बसवलेल्या संरक्षण लोखंडी जाळ्या काढण्याचा प्रयत्न केला जातो. अशा घटनांमुळे पालिकेची नाहक बदनामी होते. त्यामुळे मॅनहोल सुरक्षित केले जात आहेत', असेही पालिका कर्मचाऱ्यांनी सांगितले.
१३९६ मॅनहोलमध्ये जाळ्या
'अतिवृष्टीत दरम्यान ज्या ठिकाणी मॅनहोल उघडे ठेवावे लागतात, अशा ठिकाणी संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी पालिकेने मुंबई शहरातील ८५५, पश्चिम उपनगरातील ३५५ आणि पूर्व उपनगरातील १८६ अशा एकूण १३९६ मॅनहोलच्या आतमध्येही सुरक्षेसाठी लोखंडी जाळ्या बसवल्या आहेत. यामुळे मॅनहोलचे वरचे झाकण उघडे राहिले तरी आतमध्ये असलेल्या दुसऱ्या जाळीमुळे एखादा नागरिक पडून त्यात वाहून जाणार नाही', असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.
हेही वाचा - सुशांतच्या जीवनावर चित्रपट बनवण्याला वडिलांचा विरोध, दिल्ली न्यायालयाने याचिका फेटाळली