मुंबई : रविवारी मुंबईत झालेल्या 18 व्या टाटा मॅरेथॉनमध्ये दिव्यांग नागरिकांसाठी देखील विशेष मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि केंद्रीय कायदा व न्याय मंत्री किरेन रिजिजू यांनी दिव्यांग टाटा मॅरेथॉनला हिरवा झेंडा दाखवला. या स्पर्धेत अनेक दिव्यांग नागरिकांनी व्हीलचेअरवर बसून, सहभाग घेतला होता. यात आकर्षणाचा विषय ठरले ते सीमेवर कर्तव्य बजावताना अपंगत्व आलेले जवान. पुण्याच्या खडकी येथील सैनिक क्वार्टर मधून आलेले तब्बल सात दिव्यांग जवान या स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते.
12 वर्ष सैन्यदलात कार्यरत : यापैकीच एक सीमेवर कर्तव्य बजावत असताना अपंगत आलेले माजी सैनिक रामदास मोरे यांच्याशी आम्ही संवाद साधला आणि त्यांचा अनुभव जाणून घेतला. 'ईटीव्ही'शी बोलताना मोरे यांनी सांगितले की, 'मी बारा वर्ष सैन्यदलात सेवा दिली. ड्युटीवर असतानाच माझा अपघात झाला आणि मला अपंगत्व आलं. मग मी खडकी येथील आमच्या सेंटरमध्ये आलो. हे सेंटर आर्मी, नेव्ही आणि एअर फोर्स या तीनही सैन्य दलांमध्ये सेवा बजावताना, जेव्हा एखाद्या जवानाला अपंगत्व येतं त्या जवानांच्या पुनर्वसनासाठी हे सेंटर सुरू करण्यात आलं आहे.'
अनेकांना मिळतेय प्रेरणा : मोरे यांनी सांगितलं की, 'आमच्या खडकी येथील सेंटरमध्ये जवळपास 70 हून अधिक असे विकलांग सैनिक आहेत, ज्यांना सीमेवर कर्तव्य बजावताना अपंगत्व आलं. आम्ही अनेक खेळांमध्ये सहभागी होतो. बास्केटबॉल, हॉलीबॉल अशाही अनेक खेळांमध्ये आम्ही सहभागी होतो. यातल्या अनेक खेळांमध्ये आम्ही बक्षीस देखील मिळवली आहेत. आम्ही जेव्हा अशा स्पर्धांमध्ये सहभागी होतो तेव्हा, अनेक जण आम्हाला येऊन भेटतात. आमचा प्रवास जाणून घेतात. आमचे अनुभव विचारतात. आमचं सर्व एकूण झाल्यावर आम्हाला सांगतात की, तुमच्याकडून आम्हाला प्रेरणा मिळते. आमच्याकडून जर एखाद्याला खरचं प्रेरणा मिळत असेल तर, अशा स्पर्धांमध्ये आम्ही नक्कीच सहभागी होऊ'.
लढवय्ये सैनिक : सैनिक म्हणटलं की सदैव सिमेवर कर्तव्य बजावण्यासाठी तत्पर असलेल्या जवानांच चित्र डोळ्यापुढे येतं. मात्र त्यांच्या जीवनातले अनेक वास्तव अपल्याला माहिती नसतात. सिमेवर कर्तव्य बजावतांना अपंगत्व आलेले सैनिकांचे अख्ख आयुष्य त्यांच्यापुढे पडलेले असते. अशाही परिस्थितीत ते आपल्यासह अपल्या कुटूंबाचा धिराने सांभाळ करतात.