मुंबई - मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यापासून पालिकेचे आरोग्य, सफाई तसेच इतर कर्मचारी अहोरात्र काम करत आहेत. या फ्रन्टलाईन वॉरियर्सच्या अँटीजेन टेस्ट पालिकेकडून केल्या जात आहेत. गुरुवारपासून (दि. 24 जुलै) या टेस्टची सुरुवात करण्यात आली. त्यात आतापर्यंत पालिका कर्मचाऱ्यांच्या 2 हजार 443 चाचण्या करण्यात आल्या असून त्यापैकी 16 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. तर पोलीस विभागातील 1 हजार 525 कर्मचाऱ्यांची चाचणी करण्यात आली होती. त्यापैकी 31 पोलीस कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले आहे.
मुंबईत कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांवर उपचार करताना, मुंबईत स्वच्छता ठेवताना, मुंबईकरांना पाणीपुरावठा करताना, अन्न वाटप करताना पालिकेच्या 2 हजार 686 पालिका कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली असून 108 कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. पालिका कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण होत असल्याने त्यांच्या टेस्ट करण्याची मागणी केली जात होती. त्याप्रमाणे पालिकेने आरोग्य, स्वच्छता, मलनिःसारण यासह विविध खात्यातील कोरोनाबाबत कर्तव्य बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांची तसेच बंदोबस्तात कार्यरत पोलीस कर्मचाऱ्यांची देखील ‘अँटीजेन कीट’द्वारे टेस्ट करण्यास सुरुवात केली आहे.
मुंबई महापालिकेच्या ज्या विभागात कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणात होत आहे. अशा विभागातील पालिका कर्मचाऱ्यांच्या अँटीजेन टेस्ट केल्या जात आहेत. 25 जुलैपर्यंत पालिका कर्मचाऱ्यांच्या 2 हजार 443 टेस्ट करण्यात आल्या. त्यात 16 कर्मचारी पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले आहे. तर 2 हजार 432 कर्मचारी निगेटिव्ह असल्याचे निदर्शनास आले आहे. एफ नॉर्थ विभागात 3, डी विभागात 2, आर साऊथ विभागात 3, के वेस्ट विभागात 2, पी नॉर्थ विभागात 3, एस विभागात 3 असे एकूण 16 कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले आहे.
पालिका कर्मचारी पॉझिटिव्ह
विभाग टेस्ट - पॉझिटिव्ह - निगेटिव्ह
एफ नॉर्थ विभागात 666 चाचण्या करण्यात आल्या त्यापैकी 3 पॉझिटिव्ह तर 663 निगेटिव्ह, डी विभागात 185 चाचण्या करण्यात आल्या त्यापैकी 2 पॉझिटिव्ह तर 183 निगेटिव्ह, आर साऊथ विभागात 549 चाचण्या करण्यात आल्या त्यापैकी 3 पॉझिटिव्ह तर 546 निगेटिव्ह, के वेस्ट विभागात 256 चाचण्या करण्यात आल्या त्यापैकी 2 पॉझिटिव्ह तर 254 निगेटिव्ह, पी नॉर्थ विभागात 522 चाचण्या करण्यात आल्या त्यापैकी 3 पॉझिटिव्ह तर 519 निगेटिव्ह, एस विभागात 270 चाचण्या करण्यात आल्या त्यापैकी 3 पॉझिटिव्ह तर 267 निगेटिव्ह एकूण 2 हजार 448 चाचण्या करण्यात आल्या त्यापैकी 16 पॉझिटिव्ह तर 2 हजार 432 निगेटिव्ह आल्या आहेत.
31 पोलीस कोरोना पॉझिटिव्ह
मुंबईतील प्रतिबंधात्मक क्षेत्र, कोरोना आरोग्य केंद्र तसेच अलगीकरण केंद्र यासह नाकाबंदी व बंदोबस्ताच्या कर्तव्यावर देखील पोलीस अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित आहेत. अशा पोलीस कर्मचाऱ्यांचीही ‘अँटीजेन कीट’द्वारे कोविड चाचणी केली जात आहे. आतापर्यंत पोलीस विभागातील 1 हजार 525 कर्मचाऱ्यांची टेस्ट करण्यात आली त्यात 31 पोलीस कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले आहे.
रुग्णाचे निदान लवकर होणार
मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव आहे. कोरोना झाल्याचे लवकर निदान व्हावे, म्हणून अर्धा तासात रिपोर्ट देणाऱ्या अँटीजेन टेस्ट केल्या जात आहेत. पालिकेकडे एक लाख टेस्ट किट असून ज्या ठिकाणी कोरोना रुग्ण आढळून येत आहे अशा रुग्णाच्या संपर्कात आलेल्या लोकांची अँटीजेन टेस्ट केल्याने पॉझिटिव्ह व्यक्तीची माहिती लवकर मिळून त्याच्यावर उपचार करणे सोयीचे जाणार आहे अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.