मुंबई: मुंबईमधील नागरिक सतत आपल्या कामानिमित्त धावपळ करत असतात. कामाचे टेंशन त्यांना दिवस रात्र असते. योग्य वेळी जेवणाकडेही त्यांचे दुर्लक्ष होते. झोपही योग्य वेळेत होत नाही. अशा परिस्थितीत नागरिकांच्या आरोग्यावर त्याचा परिणाम होतो. यासाठी पालिकेने नागरिकांच्या आरोग्याचे सर्व्हेक्षण केले आहे. या सर्वेक्षणात एकूण २३ हजार ०७१ जणांच्या चाचण्या करण्यात आल्या. त्यात हायपरटेन्शनचे २९७० (१२.८७ टक्के), डायबेटिसग्रस्त २६८१ (११.६२ टक्के), हायपरटेन्श आणि डायबेटिस दोन्ही आजाराचे११४१ (४.९५ टक्के) रुग्ण आढळून आले आहेत.
म्हणून ब्लडप्रेशर वाढते: आरोग्याच्या दृष्टीने माणसाला दररोज ५ ग्रॅम मीठ खाणे पुरेसे आहे. मात्र एका आरोग्य अहवालानुसार मुंबईकर दररोज ९ ते १० ग्रॅम मीठ खातात. मीठ जास्त खाल्याने तहानही जास्त लागते. त्यावेळी प्रमाणापेक्षा जास्त पाणी प्यायले जाते. त्यामुळे रक्ताचे आकारमान वाढते आणि परिणामी ब्लड प्रेशरही वाढते. डायबेटीस आणि तणाव दूर ठेवण्यासाठी प्रत्येकाने संतुलित आहार घेतला पाहिजे. जंक फूड आणि रस्त्यावर अस्वच्छतेत विकले जाणारे पदार्थ खाणे टाळावे. नियमित व्यायाम, योग्य आहार घ्यायला हवा. पकृतीबाबत आवश्यक वेळी डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा, असे पालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी सांगितले आहे.
पालिकेची आरोग्य सुविधा: मुंबई पालिकेची नायर, केईएम व सायन ही मुंबई महापालिकेची प्रमुख रुग्णालये आहेत. २११ आरोग्य केंद्रे, १८९ दवाखाने, २७ प्रसूतीगृहे, १६ उपनगरीय रुग्णालये, ५ विशेष रुग्णालये आणि आरोग्य सेवेंतर्गत ४ मोठी वैद्यकीय महाविद्यालये, ५ रुग्णालये आणि १ दंत महाविद्यालय आहे. या ठिकाणी दर्जेदार आणि मोफत उपचार मिळत असल्यामुळे मुंबई-राज्यासह देशाच्या कानाकोपर्यातून गोरगरीब रुग्ण येत असतात. त्यामुळे रुग्णांसोबत येणार्या नातेवाईकांची संख्याही मोठी असते. या पार्श्वभूमीवर २ ऑगस्टपासून पाच मेडिकल कॉलेज, ६ उपनगरीय रुग्णालये आणि चार विशेष रुग्णालयांमध्ये डायबेटिस, हायपरटेन्शन चाचणी केंद्र सुरू करण्यात आली आहेत.
अहवालाचे निष्कर्ष: एकूण झालेल्या तपासण्या - २३ हजार ०७१, हायपरटेन्शनचे रुग्ण (hypertension) आढळले - २९७० (१२.८७ टक्के), डायबेटिसग्रस्त (diabetes) रुग्ण आढळले - २६८१ (११.६२ टक्के), हायपरटेन्श आणि डायबेटिस रुग्ण - ११४१ (४.९५ टक्के).