मुंबई - दिवसेंदिवस देशात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत आहे. त्यामानाने पीपीई किटची कमतरता भासत आहे. ही गरज लक्षात घेऊन फ्रंटलाईनवर काम करणाऱ्या डॉक्टर, पॅरामेडिकल कर्मचारी, अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी यांच्यासाठी पश्चिम रेल्वेच्या लोअर परेल वर्कशॉपमधील कर्मचारी वर्गाने सुमारे 1000 हजार पीपीई किट तयार केल्या आहेत.
पीपीई किटची मोठ्या प्रमाणात असलेली गरज पाहता रेल्वे हॉस्पिटल, भारतीय रेल्वे वर्कशॉप आणि उत्पादन विभाग यांनी पीपीई किट बनवण्याचे काम हाती घेतले आहे. सुरुवातीलाच पश्चिम रेल्वेच्या लोअर परेल वर्कशॉपमध्ये आतापर्यंत 1 हजार 50 पीपीई किट तयार करण्यात आल्या आहेत. तसेच मुंबई सेंट्रल येथील पश्चिम रेल्वेच्या जगजीवन राम रुग्णालयातील वैद्यकीय स्टाफसाठी पूर्ण पायापर्यंत पीपीई किट तयार करण्यात आली आहे.
पश्चिम रेल्वेचे जगजीवन राम रुग्णालय हे कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करणारे एकमेव रुग्णालय आहे. या रुग्णालयात 172 बेडची क्षमता आहे. या रुग्णालयात काम करणाऱ्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठी शु कव्हर्ससह 1000 पीपीई किट लोअर परेलच्या वर्कशॉपच्या कर्मचारी वर्गाने अथक प्रयत्न करून तयार केले आहेत. 80 पेक्षा अधिक कोरोना रुग्णांवर उपचार करणाऱ्या या रुग्णालयातील वैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठी हे पीपीई किट महत्त्वपूर्ण ठरले आहेत.
लोअरपरेल वर्कशॉपमध्ये एक विशेष पथक यासाठी कार्यरत असून दिवसाला 200 ते 225 पीपीई किट आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने सुचवलेल्या नियमावलीनुसार तयार करत आहे. हे किट मंजुरी दिलेल्या कापडापासून तयार केले जात आहे. याव्यतिरिक्त महालक्ष्मी वर्कशॉपनेही 200 शु कव्हर्ससह पीपीई किट तयार करण्यास सुरुवात केली आहे.