लातूर - जळकोट तालुक्यातील चेरापाटीजवळ डोळ्यात मिरची पावडर टाकून धारदार शस्त्राने वार करून तरुणाला गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे. आरोपीने पीडित व्यक्तीचा हात मनगटापासून छाटला आणि कापलेला हात घेऊन तो पळून गेला. प्रकश उर्फ मुकूंद गुणवंत माने असे पीडित व्यक्तीचे नाव असून एका व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा - लातुरातील 'त्या' हत्येचं हैदराबाद कनेक्शन
जखमी प्रकाश माने यांनी जळकोट पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार, तक्रारदार चेरापाटी येथे असणाऱ्या एका हॉटेलवर जेवणासाठी गेले होते. जेवणानंतर चालत गावाकडे जात असताना गावातील पिराजी व्यंकटी पिकले याने मोटारसायकल जवळ थांबवली. काही कळायच्या आत आरोपीने मिरची पावडर डोळयात टाकली आणि धारदार शस्त्राने वार करण्यास सुरुवात केली. तक्रारदारास जमिनीवर पाडून छातीवर पाय देऊन डाव्या हाताच्या मनगटावर वार केला. डावा हात मनगटापासून तोडून खिशातील 13 हजार रुपये सोबत घेऊन आरोपी पळून गेला. गावातील लोकांनी तक्रारदाराला गंभीर जखमी अवस्थेत पाहून खासगी वाहनाने प्रारंभी अहमदपूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. तेथे प्राथमिक उपचार करुन लातूर येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी त्यांना दाखल करण्यात आले.
हेही वाचा - लातूर-उमरगा राष्ट्रीय महामार्गाचे काम अंतिम टप्प्यात; महावितरण लाईनचा धोका कायम
18 डिसेंबरला पीडित व्यक्ती शुध्दीवर आल्यानंतर पोलिसांनी जबाब घेतला असता पीडिताच्या जवबावरून जळकोट पोलीस ठाण्यात एका विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेची माहिती पोलिस नाईक फेरोज सैयद यानी दिली. या प्रकरणातील आरोपी फरार असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक बोईनवाड करत आहेत. शुलत कारणावरून घडलेल्या या घटनेमुळे तरुणाला आपला एक हात गमवावा लागला.