लातूर - वटपौर्णिमेच्या दिवशीच नवऱ्याने पत्नी आणि मेहुण्याचा धारदार शस्त्राने खून केल्याची घटना लातुरात घडली आहे. चारित्र्याच्या संशयावरून हे कृत्य केल्याचे सांगत आरोपी स्वतःहून पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे.
सुवर्णा विकास भोपळे ही मूळची भातांगळी (ता. लातूर) येथील असून तिचा थेरगाव (ता. शिरुणांतपाळ) येथील विकास भोपळे याच्याशी विवाह झाला होता. त्यांना एक मुलगा व एक मुलगी असून या दोघांमध्ये सातत्याने भांडण होत होते. सतत बहिणीला मारहाण होत असल्याने युवराज निरुडे हा तिला माहेरी घेऊन आला होता.
मागील ४ दिवसांपासून सुवर्णा ही माहेरी असताना शनिवारी मध्यरात्री विकास भोपळे हा दुचाकीवरून आला व घराबाहेर झोपलेल्या पत्नीच्या अंगावर धारदार शस्त्राने सपासप वार केला. तर मेहुणा मारेल या भीतीने त्यालाही ठार केले. यामध्ये पत्नी सुवर्णा भोपळे व मेहुणा युवराज निरुडे यांचा जागीच मृत्यू झाला. तर सासुच्या अंगावर वार केल्याने त्याही जखमी झाल्या आहेत. या घटनेनंतर विकास स्वतःहून लातूर ग्रामीण पोलीस ठाण्यात हजर झाला आहे. जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनाची प्रक्रिया सुरू असून लातूर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.
अनैतिक संबंधात अडसर होत असल्यानेच काढला काटा -
विकासचे अनैतिक संबंध होते. याची माहिती मुलीला झाल्याने यामध्ये अडचण होऊ नये म्हणूनच त्याने हे कृत्य केल्याचा आरोप सुवर्णा हिच्या आईने केला आहे. या घटनेत सुवर्णाच्या आईने दोन पोटची मुले गमावली असून आता मनोरुग्ण असलेल्या नवऱ्याला सांभाळण्याची जबाबदारी त्यांच्यावर येऊन ठेपली आहे.