लातूर - लग्नाहून गावाकडे परतणाऱ्या दुचाकीस्वाराला मद्यधुंदीत असलेल्या पोलिसाने आपल्या स्विफ्ट कारने उडवल्याने दुचाकीवरील तिघे गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना चाकूर तालुक्यातील घरणीजवळ रविवारी दुपारी तीनच्या सुमारास घडली. यातील जखमींना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
बाकली (ता. शिरूर अनंतपाळ) येथील मनोहर केराबा कांबळे (50), आनंद शेषेराव कांबळे (35) व लक्ष्मण मनोहर कांबळे हे लग्नासाठी नांदगावला गेले होते. लग्न समारंभ आटोपून गावाकडे जात असताना नळेगाव - घरणी दरम्यानच्या पेट्रोल पंपाजवळ समोरून येणाऱ्या स्विफ्ट कार (एमएच.04 ईटी 1415) ने जोराची धडक दिली.
यात मनोहर केराबा कांबळे हे गंभीर जखमी झाले असून इतर दोघांचे पाय फ्रक्चर झाले आहेत. एपीआय संतोष दत्तात्रय गित्ते हे कारचे चालक होते. शिवाय कारमध्ये दारूच्या बाटल्या सापडल्या असून योग्य ती कारवाई करण्याची मागणी जखमींचे नातेवाईक करत आहेत.
घटनास्थळी जखमींना मदत करण्याचे सोडून पोलीस कार घेऊन पसार झाला. त्यामुळे त्याच्यावर योग्य कारवाईची मागणी होत आहे. तसेच जखमी तिघांवरही जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून चाकूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे.