लातूर - यंदा लातूर बोर्डाचा १० वी १२ वीच्या निकालाचा टक्का घसरला आहे. याला केवळ प्रश्नपत्रिकांचे बदलले स्वरुपच जबाबदार नाही तर परीक्षकांचा निष्काळजीपणाही तेवढाच जबाबदार आहे. कारण गुणपडताळणीदरम्यान अनेक विद्यार्थांचे गुण वाढले आहेत, तर लातूर बोर्डात ७ नापास झालेले विद्यार्थी पास झाले आहेत.
अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळाल्याने निकाल लागताच इयत्ता १० वी आणि १२ वीच्या विद्यार्थ्यांनी लातूर बोर्डात गुणपडताळणीसाठी गर्दी केली होती. त्याचा अपेक्षित निकालही अनेक विद्यार्थ्यांच्या हाती पडला असल्याचे समोर आले. इयत्ता १२ वीच्या तब्बल ४९२ विद्यार्थ्यांनी पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज केले होते. पैकी १७२ विद्यार्थ्यांच्या गुणांमध्ये बदल झाले आहेत. तर ७ नापास झालेले विद्यार्थी हे पास झाले आहेत. वाढलेल्या गुणांमुळे विद्यार्थ्यांना अपेक्षित महाविद्यालयात प्रवेश मिळणार आहे.
यंदा प्रश्नपत्रिकेचे स्वरूप बदलल्याने विद्यार्थ्यांना कमी गुण मिळाले असल्याचे बोर्डाच्या वतीने सांगण्यात आले होते. याबरोबरच परीक्षकांनी उत्तरपत्रिका तपासताना दाखविलेला निष्काळजीपणाही तेवढाच जबाबदार आहे. इयत्ता १० वीच्या ६६५ विद्यार्थ्यांनी पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज केला. त्यापैकी ३४० विद्यार्थ्यांच्या गुणांमध्ये बदल झाला आहे. त्यामुळे परीक्षक कशा प्रकारे उत्तरपत्रिका तपासतात हा संशोधनाचा विषय बनला आहे. काही विद्यार्थ्यांना तर २० गुणांचा फरक असल्याचे निदर्शनास आले आहे.
गुणपडताळणीच्या या पद्धतीमुळे नांदेड, उस्मानाबाद आणि लातूर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना लाभ झाला असून उत्तरपत्रिका जबाबदारीने तपासणेही महत्वाचे आहे.