लातूर - येथील जनावरांच्या आठवडी बाजारात चक्क जंगली पशु-पक्ष्यांची विक्री होत असल्याचा धक्कादायक प्रकार शनिवारी सकाळी उघडकीस आला. प्राणीमित्राने सदरील तरुणास याबाबत जाब विचारताच त्याने ते पशू तेथेच सोडून पळ काढला.
सध्या उन्हाच्या झळा वाढत असून पशु-पक्षी पाण्याच्या शोधात लोकवस्तीमध्ये दाखल होत आहेत. याचाच गैरफायदा घेत तालुक्यातील खंडापूर येथील व्यक्तीने मोराची अंडी, पारवे आणि जंगली ससे विक्रीसाठी आणले होते. मार्केट कमिटीच्या प्रवेशद्वारावरच याची तपासणी होणे गरजेचे आहे. परंतु मार्केट कमिटीच्या आवारातच त्यांची विक्री होत आहे.
या पक्ष्यांची विक्री होत असल्याची माही समजताच शनिवारी ११ वाजजताच्या सुमारास प्राणीमित्र प्रशांत जोजारे, भीमाशंकर गाढवे, सचिन सौरमल यांनी घटनास्थळी धाव घेतली. यानंतर त्यांनी वनविभागाला संबंधित माहिती दिली. वनविभागाचे अधिकारी येण्यापूर्वीच विक्रीसाठी आलेल्या तरुणाने तेथून धूम ठोकली होती. वनरक्षक एम.वाय. पवार यांनी सर्व पक्षी ताब्यात घेतले असून चाखरा येथील वन उद्यानात सोडण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. या शिवाय आठवडी बाजारच्या दिवशी या ठिकाणी वन विभागाचा कर्मचारीही ठेवला जाणार असल्याचे ते म्हणाले.
वन अधिनियमन 1972 प्रमाणे कारवाई केली जाणार असल्याचेही पवार यांनी सांगितले. सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू झाले असून पाण्याच्या शोधात असलेल्या पशु-पक्ष्यांचा असा गैरफायदा घेतला जात आहे. आज प्राणिमात्रांच्या सतर्कतेमुळे या पशु-पक्ष्यांना जीवदान मिळाले असले तरी यावर अंकुश लावण्यासाठी योग्य पाऊल उचलणे आवश्यक आहे.