लातूर - जिल्ह्यातील सैनिकांचे गाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या केंद्रेवाडीत शनिवारी रात्री सहा सैनिकांच्या घरी चोरी झाल्याची घटना घडली. यामध्ये सोने-चांदीच्या दागिन्यांसह लाखोंचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. या घटनेमुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
हेही वाचा - आचारसंहिता लागताच पालिकेत पदाधिकाऱ्यांच्या दालनाबाहेर शुकशुकाट
अहमदपूर तालुक्यातील केंद्रेवाडी या गावाची 'सैनिकांची वाडी' अशी ओळख आहे. शनिवारी रात्री चोरट्यांनी सहा सैनिकांच्या घरात हात साफ केला. यामध्ये दत्तात्रय पाटलोबा केंद्रे यांचे 5 तोळे सोने आणि 10 हजार रुपये रोख, मनोहर श्रीरंग केंद्रे यांचे 2 तोळे सोने, विश्वंभर ग्यानोबा केंद्रे यांचे 2 तोळे सोने आणि साठ हजार रुपये तसेच शेतातील मालविक्रीच्या रक्कमेची चोरी झाली. तर अशोक पंढरी केंद्रे यांचे दीड तोळे सोने, विश्वनाथ एकनाथ केंद्रे यांचे १ तोळा सोने आणि ५ हजार रुपये तसेच यशवंत नारायण केंद्रे यांच्या घरातील सर्व सामानाची नासधूस करीत सर्व साहित्य अस्ताव्यस्त करून टाकले. देशाची सेवा करणाऱ्या सैनिकांच्या घरावरच चोरट्यांनी डल्ला मारला असल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे.