लातूर - वक्तृत्व, कर्तुत्व आणि नेतृत्व यांचा त्रिवेणी संगम म्हणजे दिवंगत विलासराव देशमुख. महाराष्ट्राचा लोकनेता, मराठवाड्याचे भूमिपुत्र अशी त्यांची ओळख. विलासराव देशमुख यांचा सरपंचपदापासून ते केंद्रीय मंत्रीपदापर्यंतचा प्रवास थक्क करणारा आहे. आज विलासरावांचा 7 वा स्मृतिदिन आहे.
18 ऑक्टोबर 1999 ते 16 जानेवारी, 2003 व 1 नोव्हेंबर, 2004 ते 4 डिसेंबर, 2008 या कालखंडात विलासरावांनी दोन वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद भूषवले. वक्तृत्वाच्या आणि कर्तृवाच्या जोरावर विलासरावांनी प्रचंड लोकप्रियता मिळवली. या लोकनेत्याचा आज ७ वा स्मृतिदिन आहे.
म्हणतात ना काळाच्या ओघात माणसाचा विसर पडतो, मात्र लातूरकर याला अपवाद आहेत. विलासरावांच्या निधनाला 7 वर्ष उलटलीत, तरीही लातूरकरांच्या त्यांच्याप्रतिच्या भावना आजही कायम आहेत. सत्ताधारी असो वा विरोधक, गरीब असो या श्रीमंत विलासरावांवरील प्रेम, आस्था आजही कायम आहे.
साहेब असते तर अशक्य असे काहीच नव्हते. मात्र, सध्याची परिस्थिती आणि लोकप्रतिनिधींची अनास्था यामुळे लातूरचा विकास खुंटलाय. गेल्या 7 वर्षात साहेबांची पोकळी कुणी भरून काढू शकले नाही आणि भविष्यातही हे काम कुणाच्या हातून होणार की नाही याबाबतच्या भावना लातूरकरांनी व्यक्त केल्या आहेत.
शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक एवढेच नाही, तर त्यांच्या जाण्याने जिल्ह्याची मोठी राजकीय हानीही झाली आहे. शहराचा विस्तार तर ठप्पच आहे. शिवाय नवीन उद्योग शहरामध्ये सुरू झालेच नाहीत. उलट आहे त्या व्यवसायावर गंडांतर निर्माण झाल्याचे लातुरकरांनी सांगितले.
त्यांच्या सातव्या स्मृतिदिनी सामाजिक उपक्रमांची रेलचेल जिल्हाभर आहे. मात्र, सामान्य नागरिकांच्या तोंडून त्यांच्याविषयीच्या भावना खरोखरच हृदयाला भिडणाऱ्या आहेत.