लातूर - मोठ्या प्रतिक्षेनंतर मंगळवारी रात्री उशीरा लातूर शहरासह परिसरात दमदार पावसाने हजेरी लावली. वादळी वारे अन् विजेचा कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली होती. आतापर्यंत पाऊस जिल्ह्यातून गायब होता. दोन दिवसाच्या उष्ण वातावरणानंतर पावसाने हजेरी लावली असून यामध्ये सातत्य राहण्याची अपेक्षा लातूरकरांची आहे.
पावसाचे तीन महिने उलटल्यानंतर लातूरकरांना आशा होती ती आता परतीच्या पावसाची. आजपासूनच परतीच्या पावसाला सुरुवात झाली असल्याचे सांगण्यात आले होते. यामध्येच पावसाने हजेरी लावल्याने परतीचा पाऊसच तारणार अशा चर्चेला सुरुवात झाली आहे. आतापर्यंत केवळ ७५ मिमी पाऊस जिल्ह्यात झाला आहे. सरासरीच्या तुलनेत केवळ ५२ मिमी पाऊस झाला असल्याने लातूरकरांवर चिंतेचे ढग निर्माण झाले आहेत. पावसाअभावी खरीपातील सर्वच पिकांचे नुकसान झाले असून प्रश्न आहे तो पिण्याच्या पाण्याचा. त्यामुळे किमान परतीच्या पावसाने हजरी लावणे गरजेचे होत. गेल्या पंधरा दिवसांपासून पावसाचा थेंब पडला नसल्याने भविष्यात तरी पाऊस होतो की नाही याबाबत शंका उपस्थित केली जात होती. मात्र, मंगळवारी रात्री पावसाने हजेरी लावली आहे.