निलंगा (लातूर) - शहरात सापडलेल्या परप्रांतीय आठ नागरिकांना कोरोना विषाणूची बाधा झाल्याचे उघड झाल्याने खबरदारीचा उपाय म्हणून निलंगा शहर 1 मेपर्यंत लॉकडाऊनच राहणार आहे, अशी माहिती उपविभागीय अधिकारी विकास माने यांनी दिली. फक्त सकाळी आठ ते आकरा वाजेपर्यंत जीवनावश्यक सेवेसाठी मुभा देण्यात आली आहे, असेही त्यांनी सांगितले.
लॉकडाऊनच्या दुसर्या सत्रात शासनाने तीन झोन तयार केले आहेत. लातूर ऑरेंज झोनमध्ये आहे. त्यामुळे 20 एप्रिलनंतर काही निर्णय होऊन दिलासा भेटेल, अशी अशा येथील नागरिकांना होती. मात्र, कोरोना विषाणूचा संसर्ग झालेली व्यक्ती शहरात सापडल्याने 1 मेपर्यंत निलंगा शहरात बंधने कायम राहणार आहेत. परप्रांतीय 12 जण ज्या धार्मिक स्थळी मुक्कामी राहिले तो सर्व परिसर प्रशासनाने सील केला आहे. या ठिकाणच्या नागरिकांना घरीच राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे.
हेही वाचा - 'तबलिघी धार्मिक कार्यक्रमाला हजेरी लावणाऱ्या रोहिग्यांचा शोध घ्या'
अत्यावश्यक सुविधा किराणा मालाचे दुकान, दूध, डिझेल ,पाणी, घरगुती गॅस सकाळीं आठ वाजल्यापासून 11 वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. अन्य अत्यावश्यक सेवा बंद राहणार आहेत. मात्र, शहरातील निळकंठेश्वर मार्केट यार्ड, औरंगपुरा आणि दत्त नगरचा काही भाग या रेड झोन परिसरात 1 मेपर्यंत लॉकडाऊन राहणार असल्याचे विकास माने यांनी सांगितले.