लातूर- जिल्ह्यात वाढत्या कोरोनाच्या रुग्णांमुळे संचारबंदी लागू करण्यात आली आहे. शिवाय लॉकडाऊनच्या दोन दिवस अगोदरच दारूची दुकाने बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र, असे असतानाही रेणापूर तालुक्यातील वसंतनगर तांडा येथे अवैध दारू विक्री केली जात होती. याप्रकरणी सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून 3 लाखांचा दारूसाठा जप्त करण्यात आला आहे.
रेणापूर तालुक्यातील हा वसंतनगर तांडा दारूचा अड्डा बनले आहे. गेल्या तीन महिन्यांच्या कालावधीत तीन वेळा या ठिकाणी राज्य उत्पादन शुल्क व पोलीस प्रशासनाच्या वतीने कारवाई करण्यात आली होती. शुक्रवारी पुन्हा दारू विक्री होणाऱ्या ठिकाणी तसेच साठा करुन ठवलेल्या शेतामध्ये कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये हातभट्टी दारू व ती तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य जप्त करुन नष्ट केले आहे.
रसायनाचे 55 बॅरल, 200 लिटर गावठी दारू, नवसागर आणि गूळ जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रेणापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गोरख दिवे, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीराम माचेवाड, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे एम. एन. झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे.