निलंगा (लातूर) - आर्थिक विवंचनेतून तालुक्यातील तगरखेडा गावातील एका शेतकऱ्याने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. सुरेश वसंत माेरे (वय 40 वर्षे), असे त्या शेतकऱ्याचे नाव आहे. सुरेश हे काही दिवसांपूर्वी आपल्या मूळ गावी आले होते.
सुरेश यांच्याकडे 38 गुंठे जमीन आहे. अल्पभूधारक असल्याने ते पुण्यातील एका पेट्रोलपंपावर काम करत होते. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या टाळेबंदीमुळे त्यांची नोकरी गेली. त्यामुळे ते तगरखेडा येथे आपल्या मुळगावी आले होते. कमी शेतजमीनीवर त्यांची उपजीविका भागत नव्हती. त्यामुळे त्यांनी काही जणांकडून उसने पैसे घेतले होते. पैशासाठी त्यांनी तगादा लावला होता. मात्र, शेतात जास्त पिकत नाही व हाताला काहीच काम नाही, यामुळे पैसे कसे फेडायचे या विवंचनेत ते होते. या विवंचनेतून त्यांनी मंगळवारी (दि. 11 ऑगस्ट) रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास घरात गळफास घेत आत्महत्या केली. त्याच्या पश्चात वयोवृद्ध विधवा आई, पत्नी व दाेन मुले, आसा परीवार आहे.
याबाबत औराद पाेलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नाेंद करण्यात आली आहे. तलाठी केंचे यांनी या घटनास्थळी भेट देऊन पंचनामा करुन अहवाल तहसील कार्यालयात पाठविले आहे.