मुंबई - लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने आज देशभरातील उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. यात देशभरातील १८२ उमेदवारांचे नावे जाहीर झाली. यात राज्यातील १६ उमेदवारांचा समावेश आहे. मात्र, लातूर मतदारसंघातून जाहीर झालेल्या नावात गफलत झाल्याने 'लातूरचा उमेदवार नेमका कोण,' असा संभ्रम मतदारांसमोर निर्माण झाला आहे. उदगीरचे विद्यमान आमदार सुधाकर भालेराव आणि लातूर जिल्हा परिषदेचे सदस्य सुधाकर तुकाराम शृंगारे हे उमेदवारीचे दावेदार मानले जात होते. मात्र, यादीत सुधाकर भालेराव शृंगारे असे नाव जाहीर करण्यात आले. यामुळे गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे.
लातूर लोकसभा मतदारसंघातून उमेदवार जाहीर करताना भाजपच्या यादीत गडबड झाल्याचे समोर आले आहे. आज दिल्लीत लातूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवाराचे नाव घोषित करताना सुधाकर भालेराव शृंगारे असे नाव जाहीर करण्यात आले. नेमके हे सुधाकर कोण, असा प्रश्न जिल्ह्यातील मतदारांना पडला आहे. आमदार सुधाकर भालेराव यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी हे नाव आपलेच असावे, असा दावा केला. तर, लातूर जिल्हा परिषदेचे सदस्य सुधाकर शृंगारे मात्र यांचा संपर्क होऊ शकला नाही.