लातूर - गेल्या सहा दिवसांपासून कोविड सेंटरमध्ये काम करणाऱ्या परिचारिकांकडून काळ्या फिती लावून काम केले जात आहे. विविध मागण्यांसाठी त्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. येत्या दोन दिवसांत मागण्यांची पूर्तता न झाल्यास 8 सप्टेंबर रोजी कामबंद आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा महाराष्ट्र परिचारिका संघटनेच्यावतीने पत्रकार परिषदेत देण्यात आला आहे.
कोरोनाच्या लढाईत परिचारिका ह्या योद्धा म्हणून आपले कर्तव्य बजावत आहेत. मागील पाच महिन्यांपासून रुग्णांची अविरत सेवा करूनही त्यांच्या मूलभूत मागण्या ह्या प्रलंबित आहेत. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता कंत्राटी परिचरिकांची नेमणूक करण्यात आली होती. मात्र, कामाचा ताण आणि कोरोना रुग्णांची भीती यामुळे त्यांनी राजीनामा दिला आहे. त्यामुळे परिचरिकांवर कामाचा ताण वाढला आहे. तसेच रुग्णांची सेवा करीत असताना अनेकांना कोरोनाची लागण झाली आहे. काही परिचरिकांचा मृत्यूही झाला आहे. असे असताना कोरोनाची लागण झाल्यावर केवळ तीन दिवस क्वारंटाईन केले जाते. चौथ्या दिवशी कर्तव्य बाजवण्यासाठी हजर राहावे लागते. त्यामुळे इतरांना आणि त्यांनाही याचा धोका होऊ शकतो. पदोन्नती, रखडलेला भत्ता गेल्या अनेक दिवसांपासून परिचरिकांना मिळालेला नाही.
केवळ कोरोना योद्धा म्हणून शाब्दिक कौतुक नको तर हक्काच्या सुविधा मिळाव्यात याकरिता 1 सप्टेंबरपासून परिचारिका यांनी काळ्या फिती लावून कामाला सुरुवात केली आहे. पाच दिवस उलटून गेले तरी त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे उर्वरीत दोन दिवसांमध्ये मागण्या मान्य झाल्या नाहीत तर 8 सप्टेंबरपासून काम बंद आंदोलन करण्यात येणार असल्याचे संघटनेच्या सचिव सुमित्रा तोटे यांनी सांगितले आहे. दरम्यान, एकीकडे दिवसागणिक रुग्णांची संख्या वाढत असताना परिचरिकांचे आंदोलन याचा विचार जिल्हा प्रशासनाला तसेच सरकारला करावा लागणार हे नक्की. यावेळी राम शिंदे, राजेंद्र बहिरे, भीमराव चक्रे यांच्यासह इतर परिचरिकांची उपस्थिती होती.
हेही वाचा - 'कृष्णा'ने केले कंसकृत्य..! 13 दिवसाच्या भाचीची ड्रममध्ये टाकून केली हत्या