लातूर - चौदाव्या वित्त आयोगातून गावाच्या विकास कामांसाठी प्राप्त झालेला निधी खर्च न करता 31 लाखांचा अपहार सरपंच आणि ग्रामसेवक या दोघांनी संगनमताने केला होता. या प्रकरणी चाकूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून या दोघांनाही अटक करण्यात आली आहे. हा अपहार चाकूर तालुक्यातील आष्टा गावात झाला आहे.
चाकूर तालुक्यातील आष्टा येथे विविध विकास कामासाठी 31 लाख रुपये 14 व्या वित्त आयोगातून मंजूर झाले होते. या माध्यमातून गावातील मूलभुत प्रश्न मार्गी लागणे अपेक्षित होते. शिवाय हा निधी सन 2017 ते 2019 या कालावधीसाठी मंजूर झाला होता. मात्र, सरपंच पंचफुला रमाकांत पाटील व ग्रामविकास अधिकारी संजय जाधव यांनी मासिक बैठक न घेताच गावातील रस्ता, पाणीपुरवठा, इमारत दुरुस्ती यासाठी खर्च केल्याची नोंद केवळ कागदोपत्री केली. याकरता आवश्यक असलेले कामाचे अंदाजपत्रक, तांत्रिक मान्यता, मूल्यांकन मानांकन पुस्तिका, अंगणवाडी देयकाची रेकॉर्डदेखील ग्रामपंचायतीकडे उपलब्ध नाही. असे असताना 51 नागरिकांच्या नावाने धनादेश देऊन ही 31 लाखांची रक्कम उचलण्यात आली आहे.
याबाबत उपसरपंच आणि सदस्यांनी गटविकास अधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल केली होती. तेव्हा गटविकास अधिकारी यांनी चौकशी करून सरपंच आणि ग्रामसेवक हे दोषी असल्याचा अहवाल उपमुख्यकार्यकारी अधिकारींना दिला होता. यानंतर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल यांनी दिले होते. यावरून विस्तार अधिकारी अनंत पुठ्ठेवाड यांनी चाकूर पोलिसांत फिर्याद दिली होती. गुन्हा दाखल होताच सरपंच आणि ग्रामसेवक अधिकारी यांना अटक करण्यात आली आहे.
हेही वाचा - 'कृष्णा'ने केले कंसकृत्य..! 13 दिवसाच्या भाचीची ड्रममध्ये टाकून केली हत्या
हेही वाचा - शिवलिंग शिवाचार्य महाराज खरंच समाधी घेणार होते का? एक ना अनेक प्रश्न, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण...