लातूर - आतापर्यंत जिल्ह्यातील केवळ उदगीर शहरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत होती. रविवारी मात्र, उदगीर शहरासह लातूर, चाकूर आणि जळकोट तालुक्यात कोरोना रुग्ण आढळून आल्याने कोरोनाचा विळखा वाढला आहे.
लातुर जिल्ह्यात दिवसेंदिवस जिल्ह्यातील केवळ उदगीर शहरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत होती. मात्र, आता इतर तालुक्यांमध्येही रुग्ण संख्या वाढत आहे. रविवारी लातूर शहरातील माळी गल्ली आणि चाकूर तालुक्यातील वडवळ येथे प्रत्येकी एक रुग्ण आढळून आला आहे, तर जळकोट येथील एक पॉझिटिव्ह रुग्ण आढळला आहे. रविवारी विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात लातूर आणि चाकूर येथून 11 नमुने तपासणीसाठी आले होते तर उदगीर उपजिल्हा रुग्णालयातून 9 व्यक्तींचे नमुने तपासणीसाठी आले असून उदगीर शहरातील 3 जणांचे अहवाल हे पॉझिटिव्ह आले आहेत.
आतापर्यंत कोरोना हा एका शहरापूरता मर्यादित होता. मात्र, यामध्ये आता लातूर, जळकोट आणि चाकूर तालुक्याची भर पडली आहे. पुण्या-मुंबईहून परतलेल्या नागरिकांमुळे हा धोका निर्माण होत आहे. लातूर शहरातील माळी गल्ली येथे आढळून आलेला रुग्ण हा ठाणे येथून परतला होता. तो थेट रुग्णालयात दाखल झाल्याने कुणाच्या संपर्कात आला नसल्याचे वैद्यकीय अधिकारी यांचे म्हणणे आहे.
मात्र, आता लातूर जिल्ह्याला कोरोनाचा धोका वाढला असून लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्याच्या तोंडावर विशेष काळजी घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनासमोर आहे.