लातूर - बँक म्हणजे आर्थिक उलाढाल, ठेवी, कर्ज, व्याजदर यांसारख्याच गोष्टींचे दर्शन घडते. यामध्ये माणसाला लागणाऱ्या मुलभूत गरजांचा समावेश नसतो. मात्र, लातुरात मुलभूत गरज लक्षात घेता एक अनोखी कपड्यांची बँक सुरू करण्यात आली आहे. गेल्या ३ वर्षांपासून या बँकेची उलढालही मोठ्या प्रमाणात होत आहे. या कपडा बँकेत नागरिक जुने कपडे परंतु स्वच्छ धुऊन आणि इस्त्री करून देतात. बँकेच्या माध्यमातून गरजूंना दिली जातात. विशेष म्हणजे या कपडा बँकेतील प्रत्येक वस्तू ही समाजतील विविध घटकातील मान्यवरांनी दान केलेली आहे. एवढेच नाही तर यासाठी लागणाऱ्या जागेसाठीही कोणतेही शुल्क आकारले जात नाही. सुरुवातीला माणुसकीची भिंत म्हणून सुरू झालेल्या या कल्पनेने आता कपडा बँकेत रूपांतर केले आहे.
मध्यंतरी माणुसकीची भिंत म्हणून शहराच्या मध्यवर्ती या भिंतीवर जुनी कपडे लटकवून ठेवली जात होती. गरजूंना त्याचा लाभही होत होता. मात्र, या कपड्यांची निगा राखली जात नसल्याने काही दिवसांमध्ये या माणुसकीच्या भिंतीचे महत्त्व कमी झाले होते. मात्र, कल्पतरू बहुउद्देशीय संस्थेतील सदस्यांनी एकत्र येऊन या कपडा बँकेला सुरुवात करण्यात आली होती. या बँकेला तीन वर्षे पूर्ण होत असून या माध्यमातून तब्बल दीड लाख गरजूंना याचा लाभ झाला आहे. एवढेच नाही तर दिवाळीनिमित्त सार्वजनिक ठिकाणी बँकेच्या माध्यमातून कपड्यांचे वाटप केले जाते. त्यामुळे प्रत्यक्ष गरजूंना याचा लाभ झाला आहे. कपडे दान केलेल्यांच्या नावाची नोंद केली जाते. मात्र, कपडे घेऊन जाणाऱ्यांचे नाव प्रकाशित केले जात नाही. बँकेतील सर्व सदस्य हे लातुरमधील गरजूंना निःशुल्क सेवा देत आहेत. दिवाळी आणि 31 डिसेंबर या प्रसंगी कार्यक्रमाचे आयोजन केले जात आहे. त्यामुळे या अनोख्या कपडा बँकेत ठेवीही तेवढ्याच प्रमाणात आहेत आणि उलढलाही तेवढ्याच प्रमाणात होत आहे. या बदल्यात जमा होते ती केवळ माणुसकी.
याच अनोख्या बँकेची व्याप्ती वाढावी आणि समाजातील शेवटच्या घटकाला याचा लाभ व्हावा अशी इच्छा बँकेतील सदस्य करीत आहेत. यासाठी बँकेचे सचिव तथा व्यवस्थापक सुनीलकुमार डोपे, संस्थापक डॉ. संतोषकुमार डोपे, कृष्णा ठाकूर, रामदास काळे, डॉ. निसाले परिश्रम घेतात तर विशाल अग्रवाल यांनी ही जागा देऊ केली आहे.
हेही वाचा - दिवाळीपुरतं तरी घरी न्या! त्यांची काळजाच्या तुकड्याला 'आर्त' हाक