लातूर- खरिपात पावसाने पाठ फिरविल्याने औसा तालुक्यातील पिके धोक्यात आली. गेल्या वर्षी देखील हीच अवस्था होती. त्यामुळे यंदाही शेतकऱ्यांचे अर्थकारण कोलमडले. त्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांनी दृष्काळ जाहीर करण्याची मागणी केली आहे. त्याचबरोबर निराधारांना ३ हजार रुपये मानधन देण्याची मागणी केली आहे. यासाठी शेतकऱ्यांकडून औसा तहसील कार्यालयासमोर चटणी- भाकर आंदोलन करण्यात आले.
गतवर्षीच्या रब्बी हंगामात पेरणी न झाल्याने औसा तालुक्यातील शेतकरी व शेतमजुरांचे मोठे नुकसान झाले होते. त्यामुळे उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न निर्माण झाला होता. हीच स्थिती यंदाही असून पावसाळा सुरु होऊन तीन महिने लोटली आहे. तरी देखील समाधानकारक पाऊस झाला नाही. पाऊस येईल या आशेने औसा तालुक्यातील काही भागात अल्पशा प्रमाणात पेरण्या सुद्धा झाल्या. मात्र, पावसाने खंड पडल्याने पिके कोमेजून गेली. तर अनेक भागात पेरणीच झाली नसल्याने शेतकरी व शेतमजुरांना संकटाचा सामना करावा लागत आहे.
तर दुसऱ्या बाजूला तालुक्यातील पात्र निराधारांना अल्पशा मानधनात जगावे लागत आहे. त्यामुळे निराधारांना महिना तीन हजार रुपये मानधन द्यावे, अशी मागणी होत आहे. याबाबतीत अनेकदा शासनाकडे पाठपुरावा देखील करण्यात आला होता. मात्र, याबाबत राज्य शासनाने ठोस निर्णय घेतला नाही. त्यामुळे औसा तालुका दुष्काळ संघर्ष समितीच्या वतीने गुरुवारी स्वातंत्र्य दिनी औसा तहसील कार्यालयासमोर चटणी-भाकर आंदोलन करण्यात आले.