लातूर - धारदार शस्त्राने चुलत बहिणीच्या गळ्यावर वार करून तिची हत्या केली. त्यानंतर भावानेही आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना चाकुरमध्ये घडली आहे. बहिणीची हत्या केल्यानंतर भावाने गावाजवळच शेतामध्ये गळफास घेतला आहे. चाकूर तालुक्यातील गांजुर येथे मंगळवारी सायंकाळी ही घटना घडली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
हेही वाचा... अहमदनगर : राजकीय वादातून निवृत्त सैनिकाने केलेल्या गोळीबारात सरपंच ठार, नांदूर निंबादैत्य गावातील घटना
चाकूर तालुक्यातील गांजुर येथील फिरोज हाकाणी पठाण हा फरशी बसविण्याचे काम करीत होता. तर इयत्ता 10 विमध्ये शिक्षण घेत असलेली चुलत बहीण अफसाना मन्सूर पठाण ही त्याच्या घरासमोरच वास्तव्यास होती. या दोघांचेही आई-वडील मोलमजुरी करून घराचा उदरनिर्वाह करीत होते. मंगळवारी कामानिमित्त घरचे सर्वजण हे बाहेर गेले होते. सायंकाळी पाचच्या दरम्यान गावलागतच असलेल्या दत्तू शिंदे यांच्या शेतीमधील एका झाडाला फिरोज याचा मृतदेह आढळून आला. पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी नळेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात हलविण्यात आला होता. सर्व प्रक्रिया पार पाडून नातेवाईक घरी आले असता, अफसाना हिचा मृतदेह रक्ताने माखलेल्या अवस्थेत आढळून आला. अफसाना हिचे तोंड ओढणीने बांधले होते गळ्यावर धारदार शस्त्राचे वार होते. तर फिरोजच्या शर्टावरही रक्ताचे डाग होते. त्यामुळे चुलत बहिणीची हत्या करून त्याने गळफास घेतल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. फिरोज हा आई वाडीलांसाठी एकुलता एक मुलगा होता. त्याला दोन सख्या बहिणी आहेत. अफसाना ही एकुलती एक मुलगी असून तिलाही दोन भाऊ आहेत. या घटनेने चाकूर तालुक्यात खळबळ उडाली आहे.
हेही वाचा... सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली तेलंगणा एन्काऊंटरविरोधातील याचिका