लातूर - दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असली तरी निम्म्यापेक्षा अधिक रुग्ण कोरोनावर मात करून घरी परतत आहेत. शिवाय उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांसाठी ते प्लाझ्मा दान करण्याचा संकल्पही करीत आहेत. चार दिवसांपूर्वीच येथील माऊली ब्लड बँक आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने एका कोरोनाबाधित रुग्णाने प्लाझ्मा दान केला होता. आता तब्बल ७३ जणांनी प्लाझ्मा दान करण्याचा संकल्प केला आहे.
जिल्ह्यात एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या एक हजार 400 च्या घरात गेली आहे. शिवाय 70 जणांनी यामुळे जीवही गमावला आहे. मात्र, कोरोनावर मात केलेल्या रुग्णाच्या प्लाझ्मामुळे कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार होऊ शकतात. त्यामुळे अशा व्यक्तींना प्लाझ्मा दान करण्याचे आवाहन केले जात आहे. जिल्हा परिषदेचे सदस्य रामचंद्र तिरुके यांना दहा दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. उपचारादरम्यान त्यांनी प्लाझ्मा दान करणे किती महत्वाचे आहे याची माहिती कोविड सेंटरमधील रुग्णांना दिली. शुक्रवारी उपचार घेऊन घरी परतत असताना त्यांनी केलेल्या आवाहनाला कोविड सेंटरमधील रुग्णांनी प्रतिसाद दिला आहे. 135 रुग्णांपैकी तब्बल 73 रुग्णांनी प्लाझ्मा दान करण्याचा संकल्प केला आहे. यासंबंधी संमती पत्र या रुग्णांनी जिल्हा आरोग्य विभागाकडे सादर केले आहे. कोरोनामुळे प्रतिकूल परिस्थिती निर्माण झाली तरी अद्याप माणुसकीचे दर्शन कोरोना योद्धा घडवून देत आहेत. याचाच प्रत्यय लातूरमध्ये आला आहे. येथील समाजकल्याण विभागाच्या वसतिगृहात रुग्णांनी स्वमर्जीने संमती पत्र दिले आहे. यावेळी डॉ. श्रीधर पाठक, डॉ. माधव शिंदे, गृहपाल भोजने, डॉ. एस. एन. कुंभारे, डॉ. कोमल कांबळे, अनिल वाठोडे, कैलास स्वामी यांची उपस्थिती होती.