कोल्हापूर - कोल्हापुरात आलेल्या महापुरातून नागरिकांना वाचवण्यासाठी सर्वांची धावपळ उडाली. मात्र, महापुरात अडकलेल्या सापांना आणि मुक्या जनावरांना वाचवण्यासाठी देवेंद्र भोसले आणि त्यांच्या टीमने चांगलीच धावपळ केली. यामध्ये या टीमने आत्तापर्यंत दोनशे सापांना महापुराच्या विळख्यातून वाचवले आहे. तर, महापूर ओसरल्यानंतरही घरात शिरलेल्या सापांना पकडून जीवदान देण्याचे काम या टीमने केले आहे. त्याबाबचा ईटीव्ही भारतने आढावा घेतला आहे.
2019 साली आलेल्या महापूरापेक्षा जास्त महापूर
गेल्या पंधरा दिवसांपूर्वी कोल्हापुरमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झाली. जवळपास दोन दिवसांत 32 मिली मिटर पाऊस कोल्हापुरात पडला. इतक्या मोठ्या प्रमाणात झालेल्या अतिवृष्टीमुळे कोल्हापुरात 2019 साली आलेल्या महापूरापेक्षा जास्त महापूर आला. यंदाच्या वर्षाला विक्रमी अशा महापुराची नोंद आजपर्यंतच्या कोल्हापुरच्या इतिहासात झाली नव्हती. या महापुराचे पाणी नागरी वस्तीत घुसल्याने लोकांचे स्थलांतर करण्याची वेळ आली. यंदाच्या महापुरात एकही व्यक्ती पुराच्या पाण्यात दगावला नाही. योग्यवेळी नागरिकांचे स्थलांतर झाल्याने हा धोका टळला. मात्र, याचे महापुरात सापांना तत्सम प्राण्यांना आणि पशुपक्षांना वाचवण्याचे काम एका टीमने केले आहे. वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन अँड रिसर्च सोसायटी इंडिया या संस्थेच्यावतीने महापुरात अडकलेल्या आणि महापूर ओसरल्यानंतर घरांचा आसरा घेतलेल्या सापांना जीवदान देण्याचे काम केले आहे.
गेल्या पंधरा दिवसांपासून सापांना जीवदान देण्याचे काम
जवळपास 200 पेक्षा जास्त सापांना जीवदान देण्याचे काम देवेंद्र भोसले यांच्या टीमने केले आहे. नैसर्गिक अधिवासात सर्वांना सोडण्यात आले. गेल्या पंधरा दिवसांपासून देवेंद्र भोसले यांची टीम सापांना जीवदान देण्याचे काम करत आहे. लक्षतीर्थ वसाहत, सिद्धार्थ नगर, आंबेवाडी, प्रयोग चिखली, मुक्त सैनिक वसाहत, रमणमळा, मार्केट यार्ड आदी परिसरात हे साप पकडण्यात आले आहेत. त्यांना नैसर्गिक अधिवासात सोडण्याचे काम त्यांनी केले.
पकडलेले साप पुन्हा निसर्गात सोडण्याचे काम
शिवाजी विद्यापीठ, कळंबा, मोरेवाडी, पाचगाव, गिरगाव या नैसर्गिक अधिवासात सापांना सोडण्यात आले. देवा आणि त्यांची टीम कोल्हापूर शहरात बऱ्याच ठिकाणी पुराचे पाणी शिरले होते. त्यामुळे शहरी भागात इतर तरुणांना मदतीला घेतले होते. त्यामध्ये आशुतोष सूर्यवंशी, प्रदीप सुतार, प्रमोद पाटील, विजय गेंजगे, राहुल मंडलिक, रोहित शिर्के याचा समावेश होता. तर, उपनगर भागात अशांत मोरे, मयूर लवटे, श्वेता सुतार, स्नेहा जाधव, विकास पाटील, गणेश कदम हे काम करत होती. पकडलेले साप पुन्हा निसर्गात सोडण्याचे काम विनायक माळी, अलमतीन बांगी, विनायक आळवेकर हे करत आहेत.