कोल्हापूर - विरोधकांसोबत असलेल्या मैत्रीपूर्ण संबधामुळे आज जिल्हापरिषदेच्या अध्यक्षपदावर काँग्रेसचे राहुल पाटील व उपाध्यक्षपदावर राष्ट्रवादीचे जयवंत शिंपी विराजमान झाले. विरोधी गटातील भाजप, ताराराणी आघाडी, जनसुराज्य व आवाडे गट यांनी या पदांसाठी अर्ज दाखल केला नसल्याने ही निवड बिनविरोध झाली. दरम्यान, बिनविरोध निवड झाल्याने कार्यकर्त्यांनी जिल्हा परिषदेच्या आवारात फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष व्यक्त केला.
निवडणूक बिनविरोध
कोल्हापूर जिल्हा परिषदमध्ये आज अध्यक्ष व उपाध्यक्षपदाची निवड प्रक्रिया पार पडली. अध्यक्षपदावर राष्ट्रवादीने दावा केला होता. मात्र, बंडखोरी लक्षात घेता काँग्रेसचे आमदार पी. एन. पाटील यांचे चिरंजीव राहुल पाटील यांचे नाव पुढे आले. तर, उपाध्यक्ष पदावर राष्ट्रवादीचे जयवंत शिंपी यांचे नाव घोषीत करण्यात आले. त्यावर आज शिक्कामोर्तब करण्यात आले. यापूर्वी राहुल पाटील यांचे नाव घोषीत झाल्यानंतर विरोधी गटातील भाजप-ताराराणी-जनसुराज्य-आवाडे गट यांनी ही निवडणूक बिनविरोध करण्याचा निर्णय घेतला.
असे आहे संख्याबळ
कोल्हापूर जिल्हा परिषदेमध्ये एकूण 67 सदस्य आहेत. त्यातील भाजपचे भोजे यांना अपात्र ठरवण्यात आले. तर, एक सदस्य मृत झाल्याने आताचे संख्याबळ ६५ इतके आहे. महाविकास आघाडीचे 41 तर विरोधी आघाडीचे 24 सदस्य आहेत. उद्या होणाऱ्या पदाधिकारी निवडदरम्यान आज अध्यक्ष -उपाध्यक्ष निवड झाली. उद्या सभापती व इतर पदाधिकारी निवड होणार आहे. या निवडीवरून मात्र विरोधी गट आक्रमक होऊ शकतो. त्यासंदर्भात आज ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ व पालकमंत्री सतेज पाटील यांच्यासोबत ५ वाजता बैठक होणार आहे. या बैठकीत पदाधिकारी ठरवले जाणार आहेत.