कोल्हापूर- घरफोडी करणाऱ्या दोन सराईत चोरट्यांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी शिताफीने अटक केली आहे. हर्षवर्धन पाटील (24) आणि तेजस पाटील (22) असे अटक केलेल्या दोघांची नावे आहे. हे दोघेही हातकणंगले तालुक्यातील नेज शिवपुरी गावातील रहिवासी असून त्यांच्याकडून सोन्या चांदीचे दागिने, मोटरपंप, दोन मोबाईल आणि मोटारसायकल असा एकूण १२ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
हे दोघेही सोन्या चांदीचे दागिने विकण्यासाठी इचलकरंजी येथे येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी हातकणंगले तालुक्यातील इचलकरंजी फाटा येथे सापळा रचला. याठिकाणी सोन्या चांदीचे दागिने विकण्यासाठी आलेल्या हर्षवर्धन पाटील आणि तेजस पाटील यांना पोलिसांनी शिताफीने दागिन्यांसह अटक केली. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता, त्यांनी एक वर्षापूर्वी इचलकरंजी बाहुबली येथे घरफोडी केल्याचे सांगितले. याचबरोबर इचलकरंजी फाटा आणि आळते या भागात घरफोड्या केल्याची कबुली चोरट्यांनी दिली. पोलिसांनी त्यांच्याकडून सोन्या चांदीचे एकूण २१४ ग्रॅम वजनाचे दागिने, एक मोटरपंप, दोन मोबाईल आणि एक मोटारसायकल, असा एकूण १२ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. त्यांच्याकडून आणखीन काही गुन्हे उघड होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.