कोल्हापूर - जिल्ह्यातील मुरगूडमध्ये सात महिन्यांपूर्वी ट्रॅक्टर चालकाला मारहाण करत, ट्रॅक्टर आणि दोन ट्रॉल्या चोरणाऱ्या चोरांच्या टोळीला अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून पाच लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी पाच सराईत गुन्हेगारांना अटक केल्याची माहिती कोल्हापूर पोलिसांनी दिली.
बीड जिल्ह्यातल्या दिंद्रुडमधील रहिवाशी उत्तरेश्वर माने हे कागल तालुक्यात असलेल्या बिद्री येथील साखर कारखान्याला ट्र्र्रॅक्टरने उस पुरवठा करण्याचे काम करत होते. दरम्यान ते साखर कारखान्यात उस खाली करून मुरगूड कडे परतत असतांना त्यांना व्हॅनमधून आलेल्या या पाच आरोपींनी अडवले. त्यांना बेदम मारहाण करत, त्यांच्याकडील ट्रॅक्टर आणि दोन ट्रॉल्या घेऊन या चोरट्यांनी पळ काढला होता. या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली होती.
दरम्यान ही चोरी सराईत गुन्हेगार विजय गौड व रोहित नलगे यांनी आपल्या साथिदारांच्या मदतीने केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी या दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे चौकशी केली असता, त्यांनी चोरीची कबुली दिली. त्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी राजाराम माने, शंतनुकुमार खंदारे व विजय पाटील या आणखी तिघांना अटक केली आहे. पुढील तपास सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिली.