कोल्हापूर - जलसंपदा मंत्री जयंत पाटील आणि सहकार मंत्री बाळासाहेब पाटील हे आज कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर आहेत. कोल्हापूरसह सांगली जिल्ह्यातील संभाव्य पुर रोखण्यासाठी उपाययोजना करण्याबाबत ते स्वतः आढावा घेणार आहेत. जिल्हाधिकारी कार्यालय येथे या आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले असून बैठकीला सुरुवात झाली आहे. यामध्ये जिल्ह्यातील तीनही मंत्री ज्यामध्ये ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील आणि आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर सुद्धा उपस्थित आहेत.
कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यातील अधिकारी व्हीसीद्वारे सहभागी -
संभाव्य महापुराचा धोका ओळखून नेमक्या काय उपाययोजना करण्यात आल्या आहेत. यामध्ये प्रामुख्याने धरणातील पाणी साठ्याबाबतचे नियोजन आणि त्याद्वारे करण्यात येणाऱ्या विसर्गावर सुद्धा चर्चा होणार आहे. योग्य प्रकारे पाण्याचे नियोजन करून कशा पद्धतीने महापुराचा धोका पोहोचू नये याची सविस्तर चर्चा आजच्या बैठकीत होणार आहे. या बैठकीला कोल्हापुर, सांगली आणि सातारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तसेच पाटबंधारे विभागातील सर्वच अधिकारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी होणार आहेत.
दुपारी कागल तालुक्यातील जलसंपदा प्रकल्पांचा आढावा -
संभाव्य महापूर परिस्थितीच्या अनुषंगाने नियोजनाबाबतची आढावा बैठक झाल्यानंतर दुपारी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या कागल मतदार संघातील जलसंपदा प्रकल्पांचा तसेच पुर्नवसनाबाबत आढावा बैठक होणार आहे. त्यानंतर शिरोळ तालुक्यातील जुने तहसिल कार्यालय नगर पंचायतसाठी हस्तांतरण करणे तसेच कललेश्वर तलाव सुशोभिकरण करण्याबाबत सुद्धा या बैठकीच्या माध्यमातून चर्चा करणार आहेत. या बैठकीमध्ये जिल्ह्यातील खासदार आमदार यांच्यासह प्रशासकीय अधिकारी उपस्थित आहेत.