कोल्हापूर - इतिहासात पहिल्यांदाच घरगुती वीज ग्राहक बिलामध्ये सवलत मागत आहे, आणि ती शासनाला द्यावीच लागेल. आम्ही कोणत्याही परिस्थितीत वीजबिल भरणार नाही. तुम्ही वीज कनेक्शन तोडून तरी दाखवा, असे आव्हान देत येत्या 5 दिवसात म्हणजेच, 30 नोव्हेंबरपूर्वी वाढीव वीजबिलांसाठी संपूर्ण महाराष्ट्र बंदबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी दिला आहे.
कोल्हापुरातील मिरजकर तिकटी येथे उभारण्यात आलेल्या 'वीजबिल भरणार नाही' या डिजिटल फलकाच्या उद्घाटनावेळी ते बोलत होते. यावेळी वाढीव वीजबिलांविरोधात राज्य शासनाच्या प्रतिकात्मक पुतळ्याला राजू शेट्टी आणि सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीने चपलीचा मारा देण्यात आला. वेळ पडल्यास तेल लावलेल्या पायतानचा मार देऊ, असा इशारासुद्धा काही आंदोलकांनी दिला.
ऊर्जामंत्र्यांना शेट्टींचा इशारा -
वाढीव वीजबिलांबाबत संपूर्ण राज्यात आंदोलने झालीत. त्यानंतर ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी दिवाळीला गोड बातमी देऊ, 100 युनिट पर्यंतच्या बिलात सवलत देऊ, असे म्हटले होते. मात्र, दिवाळीला त्यांनी कोणत्याही परिस्थितीत वीजबिल भरावेच लागेल, असे म्हटले. मात्र, कोणत्याही परिस्थितीत आम्ही वीजबिल भरणार नाही, हिम्मत असेल तर कनेक्शन तोडून दाखवा, असा इशारा राजू शेट्टी यांनी दिला.
'वीजबिल भरणार नाही' या डिजिटल फलकाचे उद्घाटन -
वीजबिलांबाबत कोल्हापुरात कृती समिती स्थापन करण्यात आली आहे. दोन दिवसांपूर्वी कोल्हापुरात लावलेल्या 'वीजबिल भरणार नाही' या डिजिटल फलकाची संपूर्ण राज्यात चर्चा झाली. मात्र, प्रत्यक्षात आज या फलकाचे उद्घाटन झाले. विशेष म्हणजे, हा फलक 'तेल लावलेले पायतान' या वाक्यामुळे जास्त चर्चेत आला.
हेही वाचा - शैक्षणिक प्रवेश प्रक्रियेसंदर्भात संभाजीराजेंनी मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे केली 'ही' मागणी