कोल्हापूर - एनआयएने देशभरात विविध राज्यांतील १४ ठिकाणी अशी कारवाई केली आहे. यामध्ये कोल्हापूर आणि नाशिक या जिल्ह्यांचा समावेश आहे. या कारवाईमुळे कोल्हापूर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
राष्ट्रीय तपास संस्थेने दीड वर्षांपूर्वी कोल्हापुरातील सुभाषनगर परिसरात अशाच प्रकारची छापेमारी करून एका तरुणाला ताब्यात घेतले होते. पुन्हा राष्ट्रीय तपास संस्थेने कोल्हापुरातील इचलकरंजी हुपरी या ठिकाणी छापा टाकून कारवाई केली आहे. ही कारवाई करताना एनआयएकडून कमालीची गोपनीयता बाळगण्यात आली. पश्चिम महाराष्ट्रात आणि त्यातल्या त्यात कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या दीड वर्षात दोनदा राष्ट्रीय तपास संस्थेने छापेमारी केल्यामुळे दहशतवादी संघटनांशी या तरुणांचा संबंध असल्याचा संशय बळावला आहे.
महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकासह एनआयएकडून तपास - राज्याच्या दहशतवाद विरोधी पथकाने पुणे येथून दहशतवादी असल्याच्या संशयावरून दोघांना अटक केली होती. एनआयए पूर्वीपासून या दोघांचा शोध घेत होती. त्यांच्या चौकशीतून धक्कादायक माहिती समोर आली. त्यांनी आंबोली आणि चांदोली येथील जंगलात स्फोटकांची चाचणी घेतली असल्याचे एनआयएच्या तपासात निष्पन्न झाले. त्यानंतर महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाच्या अधिकाऱ्यांनी निपाणी, संगमेश्वर, आंबोली, चांदोली या परिसरात तपासणी करून संशयितांचा निवास कोठे होता, याचा शोध घेतला. हे दोघे संशयित पीएफआयशी संबंधित असल्याची शक्यता असल्याने, त्याअनुषंगाने एनआयएने स्वतंत्रपणे तपास सुरू केला आहे.
कोल्हापूर दहशतवाद्यांच्या हिटलिस्टवर - पुणे येथून दहशतवादाच्या संशयातून अटक केलेल्या संशयितांचा कोल्हापूर जिल्ह्यात वावर होता. त्यांना स्थानिक मदत मिळाली असल्याचा तपास यंत्रणांना संशय आहे. पीएफआय या दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याच्या संशयावरून आतापर्यंत एनआयएकडून तिघांची चौकशी करण्यात आली आहे. त्यामुळे कोल्हापूर जिल्हा हिटलिस्टवर असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
- स्थानिक पोलीस अनभिज्ञ - राष्ट्रीय तपास संस्थेने कोल्हापूर जिल्ह्यात कारवाई करूनही स्थानिक पोलिसांना याबाबत कोणतीच माहिती नाही. पुण्यात अटक केलेल्या दहशतवाद्यांनी कोल्हापूर जिल्ह्यात रेकी केल्याची कबुली दिली आहे. यासंदर्भाने राष्ट्रीय तपास यंत्रणेने छापेमारी केली असावी अशीही शक्यता वर्तवण्यात येत आहे.
- एनआयए चौथ्यांदा कोल्हापुरात - यापूर्वी एनआयचे पथक ज्येष्ठ कामगार नेते गोविंद पानसरे व ज्येष्ठ विचारवंत डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येच्या तपासासाठी कोल्हापुरात आले होते. त्यानंतर २२ सप्टेंबर २०२२ रोजी कोल्हापूर येथील एकाला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्यानंतर ३१ जुलै २०२२ रोजी हुपरी येथे एनआयएकडून छापा टाकण्यात आला होता.
हेही वाचा-