कोल्हापूर : मराठा आरक्षण प्रकरणावर मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. या प्रकरणी दररोज सुनावणी घेण्यास न्यायालयाने तयारी दर्शविली आहे. त्यासाठी लेखी दावे-प्रतिदावे आणि त्यासाठी लागणारा वेळ ठरवून घेण्यास दोन्ही बाजूच्या पक्षकारांना सांगण्यात आले आहे. याबाबत मराठा आरक्षणाचे समर्थक आणि खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्यासोबत बातचीत केली असता, त्यांनी सर्वोच्च न्यायालयातील ही सुनावणी 'व्हर्च्युअली' न होता 'फिजिकली' घेण्यात यावी, असे मत मांडले आहे.
हेही वाचा - 'आता राज्य सरकारची लढाई वाढलीये'; मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटलांचे मत
आजपर्यंतच्या सर्व सुनावणीमध्ये मी प्रत्यक्ष सहभागी झालो आहे. मात्र, आज कोरोनाच्या पार्श्वभूमीवर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून ही सुनावणी पार पडली. यावेळी दोन्ही बाजूंच्या वकिलांनी आपापली बाजू मांडली. मात्र. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी होण्यापेक्षा ती फिजिकली म्हणजेच प्रत्यक्ष पार पडावी, अशी वकिलांनी मागणी केली असून माझी सुद्धा हीच मागणी असल्याचे खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी म्हटले.
मराठा आरक्षणासंदर्भात आज (मंगळवार) सर्वोच्च न्यायालयात पार पडलेल्या सुनावणीमध्ये संभाजीराजे छत्रपती व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी झाले होते. याबाबत त्यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी मराठा आरक्षण हा खूप मोठा विषय आहे. त्यामुळे सुनावणीवर व्हर्च्युअल पद्धतीने न होता फिजिकली पद्धतीने पार पडली पाहिजे, अशी मागणी केली.
आज पार पडलेल्या सुनावणीमध्ये प्रामुख्याने पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांच्याबाबत चर्चा झाली. याबाबत अंतरिम निर्णय पुढच्या बुधवारी म्हणजेच 15 जुलै रोजी होणार आहे. न्यायाधीशांनी सुद्धा दोन्ही बाजूंच्या वकिलांनी आपल्या नोट्स सुद्धा सादर करा, जेणेकरून सविस्तर चर्चेसाठी अधिक सोपे जाईल असे म्हटले असल्याचे संभाजीराजे यांनी सांगितले.
हेही वाचा - मराठा आरक्षण : आजची सुनावणी संपली; पुढील महिन्यात होणार दैनंदिन सुनावणी