कोल्हापूर - जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत कोणतीही नोकर भरती प्रक्रिया राबवू नका, या मागणीसाठी हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारला जाग आणण्यासाठी मराठा क्रांती मोर्चा तर्फे उद्या (सोमवार) मुंबईत निदर्शने करण्यात येणार आहेत, अशी माहिती मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक दिलीप पाटील यांनी दिली. कोल्हापुरात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. कोल्हापुरातून सुद्धा मोठ्या संख्येने चार चाकी गाड्यांमधून उद्या या मोर्चासाठी मराठा समाजातील नागरिक मुंबईकडे रवाना होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिली आहे. यामुळे मराठा समाजात असंतोष निर्माण झाला आहे. त्यातच राज्य सरकार नोकर भरती करत आहे. त्यामुळे हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मराठा समाज आक्रमक झाला असल्याचे पाहायला मिळत आहे. जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत राज्य सरकारने कोणतीही नोकरभरती करू नये. तसेच सारथी संस्था पुन्हा सुरू करावी, या मागणीसाठी राज्यभरातून मराठा क्रांती मोर्चाचे हजारो कार्यकर्ते उद्या मुंबईत जाऊन प्रदर्शन करणार आहेत. कोल्हापुरातून सुद्धा उद्या पहाटे 100 हुन अधिक चारचाकी गाडया निघणार असल्याचे समन्वयकांनी सांगितले.
लेखी आश्वासनाशिवाय परत येणार नाही -
उद्याच्या मुंबईतील मोर्चामध्ये राज्यभरातील हजारो कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. जोपर्यंत नोकर भरतीची स्थगिती आणि सारथी संस्था सुरू करणार असल्याबाबतचे लेखी आश्वासन राज्य सरकार मार्फत आम्हाला मिळणार नाही, तोपर्यंत मंत्रालयासमोर ठिय्या मांडणार असल्याचं यावेळी मराठा क्रांती मोर्चाचे सचिन तोडकर यांनी स्पष्ट केलं.