कोल्हापूर - नोकरीमुळे मुंबईत राहत असलेल्या प्रशांत आणि उज्वला कदम यांचा चार वर्षांचा मुलगा समर्थ, शाळेला सुट्टी असल्याने 16 मार्च रोजी कोल्हापुरातील उत्रे गावी आजोबांकडे आला. मात्र, पुढे नेमके काय होणार आहे, याची त्याला आणि घरातील कोणालाही कल्पना नव्हती. जगभरात दहशत माजवणाऱ्या कोरोना विषाणूचे संकट देशातही आले आणि सर्वत्र लॉकडाऊन सुरु झाले. समर्थचे आजोबा प्रकाश पाटील हे त्याला मुंबईला पाठवणार तोच लॉकडाऊन सुरु झाले आणि आज तब्बल 52 दिवसांपासून समर्थ त्याच्या आईपासून दूर कोल्हापूर येथे अडकला आहे.
हेही वाचा... Mother's Day: महिलांना कुठला आलाय लॉकडाऊन ? असा प्रश्न मनात असेल तर ही बातमी नक्की पाहा
आईशिवाय 52 दिवस, दिवसेंदिवस समर्थ खचतो आहे...
पहिला लॉकडाऊन संपला, दुसराही संपला. मात्र, गेल्या 50 दिवसांपासून 'आई आज भेटेल, उद्या भेटेल' अशीच आश्वासने आपण चिमुकल्याला देत आहेत, असे समर्थचे आजोबा प्रकाश पाटील यांनी सांगितले आहे. तसेच आई भेटत नसल्याने तो मनातून पूर्णपणे खचून जात आहे, असेही त्यांनी सांगितले.
तो दररोज विचारतोय... आई कधी येणार ?
समर्थने आता जेवणही कमी केले आहे. सकाळी उठल्यानंतर दिवसभर घरातील मुलांसोबत तो चांगला खेळतो. परंतु सायंकाळी त्याला आपल्या आईची आठवण येते. मग कुठे देवघरात जाऊन देवाकडे प्रार्थना करतो आणि सतत एकच प्रश्न विचारतो की माझी आई कधी येणार ? असेही समर्थच्या आजोबांनी सांगितले.
त्याला आईची भेट होणे अत्यंत आवश्यक : डॉक्टर
समर्थच्या दिवसभरांच्या वागणूकीतील बदलानंतर समर्थच्या आजोबांनी त्याला डॉक्टरकडे आणले. डॉक्टरांनी देखील त्याला आईची भेट होणे अत्यंत गरजेचे असल्याचे म्हटले आहे.
आमची शासनाला विनंती आहे.. त्याला आम्हाला इकडे आणू द्या - समर्थची आई
समर्थची आई उज्वला कदम, यांनी प्रशासनाला आपण सहकार्य करत आहोत. मुलाला आणण्यासाठी अनेकवेळा विनंती आणि अर्ज केले आहेत. परंतु अद्याप आम्हाला कोणतेही प्रत्युत्तर मिळालेले नाही. तेव्हा कृपया आमची विनंती ऐकावी आणि समर्थला आम्हाला इकडे आणू द्या, असे उज्वला यांनी म्हटले आहे.
खरं तर आज मातृदिन आहे. अनेकजण आपल्या आईसोबत आहेत, तसेच अनेक माता आपल्या मुलांसोबत आहेत. मात्र, ध्यानीमनी नसतानाही लागू झालेल्या या लॉकडाऊनमुळे मागील 52 दिवसांपासून या 4 वर्षांच्या बालकाची आणि त्याच्या आईची झालेलील ताटातबट पाहून यांची भेट घालून देण्यासाठी प्रशासनाने सुद्धा सहकार्य करेल, अशी आशा व्यक्त करुयात.
हेही वाचा... हिरकणी..! मुलासाठी दिव्यांग मातेचा विशेष दुचाकीवरून 1200 किलोमीटरचा प्रवास